मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. यानंतर आता शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत' असं भावनिक ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलं. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर मी मीडियाशी नक्की बोलेन,' असं त्यांनी सांगितलं आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता रोहित पवार यांची भूमिका काय असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काही मिनिटांपूर्वी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरील प्रोफाईल फोटो बदलत शरद पवारांसोबत असलेला फोटो टाकला आहे. त्यामुळे ते शरद पवारांच्या सोबतचं राहणार असल्याचे बोलले जात आहे.
'अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे' असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवारांना याबाबतची कल्पना होती का, याबाबत स्पष्टपणे सांगितले नाही. शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.
रातोरात सोंगट्या बदलल्या कशा?
काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे.
शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार अशा घडामोडी सुरू असतानाच आज राजभवनातून मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.