मुंबई - राज्यातील राजकीय अस्थिरता संपुष्टात येऊन महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी दिली नाही. ज्याप्रकारे शपथविधी उरकला, ते पाहता काहीतरी काळंबेरं असल्याचं दिसत आहे असं काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच आमचे सर्व आमदार एकत्र आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने ही घटना लिहिली जाईल असं देखील म्हटलं आहे. अहमद पटेल यांनी 'महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने ही घटना लिहिली जाईल. काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी राज्यपालांनी दिलीच नाही. महाराष्ट्राची जनता ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. संविधानाची अवहेलना करून शपथविधी उरकण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही बैठका झाल्या. सत्तास्थापनेसाठी काँग्रेसकडून उशीर झालेला नाही' असं म्हटलं आहे.
'शपथविधीचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आमचे सर्व आमदार एकत्र आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने हा सगळा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बहुमताची चाचणी जिंकणार आहे' असं देखील अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. भाजपाने थेट राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाच सोबत घेत सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शरद पवारांना अंधारात ठेवून अजितदादांनी हा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. याला पक्षाचा पाठिंबा नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे. यानंतर आता शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पक्ष आणि कुटुंब दोन्ही फुटले आहेत' असं भावनिक ट्विट सुप्रिया यांनी केलं आहे. तसेच पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या. व्हॉट्सअॅप स्टेटस बदलून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 'पार्टी अँड फॅमिली स्प्लिट' असं नवं स्टेटस त्यांनी ठेवलं आहे. आमच्या पक्षातच नव्हे तर कुटुंबातही फूट पडली आहे, असं त्यांनी म्हटलं. पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे. त्यानंतर मी मीडियाशी नक्की बोलेन,' असं त्यांनी सांगितलं.