मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय नाट्यानंतर पुन्हा एकदा सर्वात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तीन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश होते. तत्पूर्वीच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. जे मातोश्रीवरुन बाहेर न पडणाऱ्यांनी अनेकांच्या पायऱया झिजवल्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, जनतेनं जनादेश देऊनही त्यांनी आमच्याशी चर्चा करण्याच टाळलं आणि विचारांची युती नसणाऱ्या पक्षांसोबत एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापली, असे म्हणत शिवसेनेवर टीका केली. तसेच, अजित पवारांनी राजीनामा दिला असून आम्हीही सत्ता स्थापन करणार नाहीत, मीही राज्यपाल महोदयांकडे जाऊन राजीनामा देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.
महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले असून भाजपा विरोधी पक्षात काम करणार असल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. नवीन सरकारला माझ्या शुभेच्छा पण हे सरकार दिर्घकाळ टीकेल असे वाटत नाही, असेही फडणवीस यांनी म्हटलंय.