CM Uddhav Thackeray on Petrol Diesel Prices: गेल्या अनेक महिन्यांपासून गगनाला भिडणारे पेट्रोल, डिजेल आणि गॅसचे दर वाढत असल्याने जनता त्रस्त होती. अशा वेळी केंद्र सरकारने सामान्य जनतेला दिलासा दिला. देशातील जनतेचा विचार करता केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये प्रति लिटरने कमी करत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९ रुपये ५० पैशाने तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होतील. तसेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला काही अंशी दिलासा मिळाला. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याबाबत काहीसे वेगळे मत व्यक्त केले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...
केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. डिझेलवरील अबकारी कर देखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
माजी मुख्यमंत्री फडणवीस केंद्र सरकारच्या निर्णयावर म्हणाले...
पंतप्रधान मोदींचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठीचा आहे. नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलं की, ते नेहमीच सर्वसामान्यांची काळजी करतात. तसेच, सातत्याने गरिबांच्या कल्याणासाठी काम करतात. माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की, राज्य सरकारनेही इंधनदरात कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे ट्विट फडणवीस यांनी केले.