मुंबई - सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप भाजपाने सातत्याने केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका करणाऱ्या भाजपावर हल्लाबोल केला आहे. 'आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहणार. त्यात तडजोड नाही' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच 'हिंदुत्वाच्या मुद्दयावर आम्ही एकत्र आलोे. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही' अशा शब्दांत भाजपावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या मुलाखतीत सरकार स्थापनेच्या घडामोडीपासून वादग्रस्त नागरिकता कायद्यापर्यंत, राहुल गांधींपासून अजित पवारांपर्यंत प्रत्येक प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली आहेत. हिंदुत्वासाठी आपण युती टिकवलीत. एकप्रकारे चांगलं चाललेलं घर होतं, त्यात भाऊबंदकीचं चित्रसुद्धा महाराष्ट्राने पाहिलं… ही नाती अशी का तुटली? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावर 'मी आजही सांगतो, शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याकरिता जन्माला आली. मराठी माणसासाठी जन्माला आली. त्यानंतर देशातील हिंदूंवर गंडांतर येतंय असं शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आलं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला. 1987 सालची पोटनिवडणूक ही कदाचित पहिली निवडणूक असेल, जी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर केवळ लढलीच नाही तर जिंकलीही असेल. मग भाजप सोबत आला. त्यानंतर जे काय घडलं… मग रथयात्रा असेल… वगैरे वगैरे करीत दोन समविचारी पक्ष एकत्र आले. हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर एकत्र आले. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही' असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
आज हिंदुत्वाचं काय झालं? या राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला 'आम्ही हिंदुत्वावर ठाम आहोत आणि राहणार. त्यात तडजोड नाही' असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच 'एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या विचारधारा आहेत ना. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय' असं देखील उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमध्ये सध्या महाराष्ट्राचं राजकारण घडलंय किंवा बिघडलंय. काहींचं बिघडलं, काहींचं घडलं. आपण समाधानी आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी घडवणारा आहे, बिघडवणारा नाही. ज्यांचं कुणाचं बिघडलंय असं वाटत असेल तर त्यांनी ते स्वतःहून बिघडवून घेतलंय. मी नाही बिघडवलं! बरं, जसं ठरलं होतं तसं घडलं असतं तर आज मी आपल्यासमोर मुख्यमंत्री म्हणून बसलो नसतो. मी नेहमीचा जसा आहे आणि पुढेही राहणार आहे, तसाच बसलो असतो.''
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्रीपद मिळविले. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. आता येत्या 4 महिन्यांत ठाकरेंना विधानसभा किंवा विधानपरिषदेतून निवडून जावे लागणार आहे. विरोधक त्यांची मागच्या दारातून येणार अशी खिल्ली उडवत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला होता. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन, असे ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य
China Coronavirus : धक्कादायक! चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या भीतीने पाळीव प्राण्यांना घराबाहेर फेकलं
Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड
जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना
Budget 2020: नेपाळ, चीनला बजेटच्या प्रस्तावातून हादरा