कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धोरण आणावे, अशी विनंती मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ठाकरे यांच्यासह सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत मोदी यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.
राज्यात फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण वेगाने पूर्ण करीत आहोत. दुसऱ्या लाटेचे शेपूटदेखील अद्याप वळवळत आहे. रुग्णसंख्या घटत असली तरी पूर्णपणे कमी झालेली नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडत आहेत, गर्दी करत आहेत. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य प्रयत्न करते आहेच; पण केंद्रीय पातळीवर व्यापक धोरण आखावे लागेल, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. आम्ही २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन नजीकच्या राज्यातून आयात झाला तरच मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणाहून ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळण्यासाठी केंद्राने सहाय्य करावे, अशी मागणी ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.
औषधे सहजपणे उपलब्ध व्हावीत‘मोनोक्लोनल एन्टिबॉडीज’ हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. मात्र, त्याची किंमत ५० ते ६० हजार प्रतिडोस असून, तिसऱ्या लाटेत ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील, याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांवर किमतीचे निर्बंध आणावेत, तसेच त्याची सहज उपलब्धता होईल हे पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
जादाचे तीन कोटी डोस द्या
- सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये अद्यापही संसर्ग आहे. या जिल्ह्यांमधील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना पूर्ण दोन्ही डोस देणे गरजेचे आहे.
- सध्या ८७.९० लाख डोस दिलेले आहेत. त्यामुळे जादाचे ३ कोटी डोस मिळाले तर प्राधान्याने या सर्व जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करता येईल असे ते म्हणाले.
- महत्त्वाच्या औषधांच्या किमती नियंत्रित कराव्यात तसेच कोरोनोत्तर उपचारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी, अशी विनंती केली.