मुंबई : रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही. मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते मंगळवारी विधानसभेत बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात वकिलांची फौज जशीच्या तशी आहे, भूमिकेत बदल नाही, काहीही बदललेलं नाही. ही लढाई लढत असताना मध्येच कुणी टुमणं काढलं इतर समाजाचे आरक्षण काढणार का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. मात्र, आज मी अत्यंत जबाबदारीने, ठामपणे सांगतो आहे की मराठा समाजाला त्यांचे न्यायहक्क मिळवून देताना दुसऱ्या कोणत्याही समाजाचा एक कण सुद्धा आम्ही काढून घेणार नाही. हे रेकॉर्डवर आहे, समाजात जे कोणी आग लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पाणी टाकावे लागेल. आपण टाकले नाही, महाराष्ट्रातील जनता टाकेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
याशिवाय, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. मराठा आरक्षणात ना आपण भूमिका बदलली ना वकील बदलले. आपण ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी मानगुटीवर बसण्याचा निर्णय घेतला तर काय करणार, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मागील काळात अनेक जण कुंडल्या काढत होते, आता ते पुस्तक वाचू लागले. अहवाल वाचू लागले आहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच, विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिले आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काहीही करू शकणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
याचबरोबर, कोरोनाकाळात होणारा भ्रष्टाचार रोखायला हवा, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सडेतोड उत्तर देत निशाणा साधला. राज्यान कोरोना रोखण्यास केलेले उपाय डब्ल्यूएचओला आणि वॉशिंग्टन पोस्टला दिसले ती तुम्हाला दिसली नाही, याचे वाईट वाटते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, "संसदेचे अधिवेशन घेतले गेलेच नाही. आपण दोन दिवस अधिवेशन घेतो आहे. कारण आता कोरोनाचा धोका कमी होत आहे. आम्ही काही श्रेय घेत नाहीत, कारण ही वेळ नाही आहे. पण, कोरोना रोखण्यास केलेले उपाय डब्ल्यूएचओला आणि वॉशिंग्टन पोस्टला दिसले ते तुम्हाला दिसले नाहीत याचे वाईट वाटते. धारावी मॉडेल ज्याचे कौतुक जागतिक पातळीवर केले गेले."
माझे कुटंब माझी जबाबदारी मोहिम राबवणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. त्यातून दोन तीन गोष्टी आपण साधल्या आहेत. घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची चौकशी केली, तपासणी केली, जनजागृती केली, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मृत्यूंची संख्या लपवलेली नाही म्हणूनच इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहे, असेही त्यांनी म्हटले.