बंधूंनो, आता काँग्रेस उघडपणे व्होट बँक आणि तुष्टीकरणाचा खेळ खेळत आहे. आपण ऐकले असेल, आता इंडी आघाडीचे लोक व्होट जिहादसाठी आवाहन करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत, असे म्हणत आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर थेट हल्ला चढवला. ते भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
"ये रिश्ता क्या कहलाता है?" -मोदी म्हणाले, "महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत. शिंदेजींनी नुकतेच आपल्या भाषणातही याचा उल्लेख केला. कसाबसह जे 10 दहशतवादी पाकिस्तानातून आले होते, असे वाटते, काँग्रेस त्यांच्यासोबत काही तरी नातेसंबंध सांभाळात आहे. देश विचारतोय, काँग्रेसचे लोक आणि दशतवाद्यांच्या या नात्याला काय म्हणायचे? (ये रिश्ता क्या कहलाता है?)"
लक्षात असू द्या मोदी पर्वतासारखा तुमच्या समोर उभा आहे -"देश तो दिवस विसरलेला नाही, जेव्हा काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांचे स्वागत पंतप्रधानांच्या निवासस्थानी होत होते. देशाने तो दिवसही बघितला आहे. जेव्हा दिल्लीत बाटला हाऊसमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या अश्रू ढाळत होत्या. दहशतवाद्यांच्या मरण्यावर. इंडी आघाडीवाल्यांनो तेच दिवस परत आणायचे आहेत का?" असा सवाल करत, "लक्षात असू द्या मोदी पर्वतासारखा तुमच्यासमोर उभा आहे," असा इशाराही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.
"...राम मंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू" -एका जुन्या काँग्रेस नेत्याच्या विधानासंदर्भात बोलताना मोदी म्हणाले, "आपण आश्चर्य वाटून घेऊ नका, पण एका जुन्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, न्यायालयातून जेव्हा राम मंदिराच्या बाजूने निर्णय आला होता, तेव्हा शहजाद्याने (राहुल गांधींना उद्देशून) खास लोकांची मिटिंग बोलावली होती. शहजादा म्हणाला होता, काँग्रेस सरकार आल्यानंतर, राममंदिरासंदर्भातील निर्णय बदलून टाकू. यांच्या वडिलांनी तीन तलाक प्रकरणात शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्मय बदलला होता. म्हणत आहेत, त्याच पद्धतीने राम मंदिराचा निर्णयही बदलू."