राज्यात (महाराष्ट्रात) कोरोना संक्रमितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 3081 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 1323 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज राज्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. याच बरोबर, आता राज्यातील एकूण सक्रीय रुग्णांचा आकडा 13 हजार 329 वर पोहोचला आहे.
एकट्या मुंबईत 1956 नवे कोरोनाबाधित -देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या 24 तासांत तब्बल 1956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. मुंबईतील हा आकडा पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणार आहे. दरम्यान मुंबईत 763 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी पोहोचले आहेत. एकट्या मुंबईत सक्रीय रुग्णांची सख्या अर्थात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9191 एवढी आहे.
राज्यात गुरुवारीही 2,813 नवे कोरोनाबाधित समोर आले होते. गेल्या सुमारे चार महिन्यांतील एका दिवसात नोंदवली गेलेली ही कालची सर्वाधिक रुग्ण संख्या होती. दिलासादायक गोष्ट म्हणजे कालही कुठल्याही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तसेच बुधवारीही राज्यात 2701 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.