Maharashtra Corona Updates: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार ४६६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचं मुंबई हे केंद्र ठरताना दिसत आहे. मुंबईत आज १० हजाराहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ५५८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ६६ हजार ३०८ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात दिवसभरात ७५ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील ४० रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ६५३ इतका झाला आहे. यातील ४०८ रुग्ण मुंबईत आहेत. तर पुण्यात ७१ रुग्णांची नोंद आहे.
कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत ६७ लाख ३० हजार ४९४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६५ लाख १८ हजार ९१६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या १ लाख ४१ हजार ५७३ झाली आहे.
राज्यात मिनी लॉकडाऊन?गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यातच देशात ओमायक्रॉन व्हेरियंटसह कोरोनाचं संकट वाढत असल्यानं अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. आता पश्चिम बंगाल, हरियाणा मध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्व शाळा, कॉलेज, सलून, उद्यानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयांमधील उपस्थितीवरही 50 टक्क्यांचे निर्बंध लावले आहेत.एकप्रकारे जवळजवळ बंगालमध्ये मिनी लॉकडाउन करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील मिनी लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.