"राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या एक लाखापेक्षा अधिक झाली आहे. आघाडी सरकारला कोरोना हाताळणीसाठी सक्षम धोरण आखता न आल्याचीच फळे राज्यातील जनता भोगत आहे," अशी टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
"राज्यातील कोरोना बळींच्या संख्येने नुकताच एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांतील मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. आघाडी सरकारला कोरोना प्रसारामुळे उद्भवलेली स्थिती योग्य तऱ्हेने हाताळता न आल्यानेच महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्या १ लाखापेक्षा अधिक झाली आहे. राज्य सरकारच्या या धोरण लकव्यामुळेच कोरोना मृत्यूच्या संख्येत महाराष्ट्र जगात दहाव्या क्रमांकावर गेला आहे," असं केशव उपाध्ये म्हणाले.
राज्य सरकारला कोरोना प्रसार रोखण्यात आलेल्या अपयशावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलन करण्याचे नाटक केले. राज्य सरकारने इंधनावरील कर दोनदा वाढविले असताना त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला नाही. काँग्रेसला राज्य सरकारमध्ये किंमतच उरलेली नाही. त्यामुळे आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने इंधन दरवाढीविरुद्ध आंदोलनाचा फार्स केल्याचंही त्यांनी नमूद केलं. गोंधळ कायम"मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे लॉकडाऊन शिथील करण्याबाबत ठाम धोरण नसल्याने राज्यात सर्वत्र गोंधळ निर्माण झाला आहे. कोणते निर्बंध उठवले, कोणते निर्बंध कायम आहेत याची स्पष्टता राज्य सरकारकडून होत नसल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ निर्माण झाला आहे. प्रशासनातील गोंधळाचा फटका सामान्य माणसाला बसतो आहे," अशी टीकाही उपाध्ये यांनी केली.