मुंबई: राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल ३ हजार कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे ३० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे ३ हजार ४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५० हजार २३१ वर पोहोचला. राजधानी मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ७२५ रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतल्या कोरोना बाधितांची संख्या ३० हजार ५४२ वर गेली. २४ तासांमध्ये मुंबईत ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत ९८८ कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत.राज्यात दिवसभरात ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा १ हजार ६३५ वर जाऊन पोहोचला. मागील आठ दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढली. या आठही दिवसांत २ हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर आज दिवसभरात तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं राज्यातल्या जनतेची चिंता वाढली आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, रायगड, पालघर, सोलापूर, नागपूरमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.