मुंबई : महाराष्ट्राला साहित्य, लोककला-संस्कृती आणि साहित्याचा उतुंग वारसा लाभला असून, मुंबई आर्थिकबरोबरच देशाची सांस्कृतिक राजधानीदेखील आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लोकमत दीपोत्सवच्या साहळ्यात काढले. मराठी दिवाळी अंकाच्या विश्वात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या खपाची विक्रमी नोंद केली आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने (एबीसी) ‘दीपोत्सव’ला लक्ष खपाचे प्र्रमाणपत्र देऊन मराठी भाषेतील या साहित्यसृजन उत्सवावर अधिकृततेची मोहर उमटवली. याप्रीत्यर्थ राजभवन येथील दरबार हॉलमध्ये ‘अभिमान मराठीचा’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत परिवाराचे चौथ्या पिढीचे प्रतिनिधी आर्यमन देवेंद्र दर्डा यांनी एबीसीचे प्रमाणपत्र मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र राज्यपालांना अर्पण करण्यात आले. मराठीतील दिवाळी अंकाच्या परंपरेचा उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, की लोकमतच्या दीपोत्सवला एबीसीचे प्रमाणपत्र मिळणे हा तर शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मराठी दिवाळी अंकाच्या परंपरेचा सन्मान आहे. राज्यात दरवर्षी ४०० हून अधिक दिवाळी अंक प्रकाशित केले जातात. ही परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याची आवश्यकता आहे. ब्लॉग, फेसबुक अशा विविध माध्यमांतून अनेक तरुण लेखक सध्या पुढे येत आहेत. दिवाळी अंकाच्या माध्यमातून या तरुणांना साहित्य चळवळीशी जोडणे आवश्यक असल्याचे सांगत ई-दिवाळी अंक प्रकाशित व्हावेत, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.या गौरव सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की मराठी जणांना अभिमान वाटावा असे शिखर लोकमत दीपोत्सवने पादाक्रांत केले आहे. माध्यम क्षेत्रात लोकमतने नेहमीच विविध प्रयोग केले. सर्व प्रकारच्या वाचकांना काय हवे आहे याची अचूक ओळख हेच लोकमतचे यश आहे. सर्व वाचकांना आपलासा वाटणाऱ्या लोकमत दीपोत्सवमधून दर्जेदार साहित्य, माहिती आणि विचार मिळतात. जोडीलाच आकर्षक मांडणीमुळे दीपोत्सवचा अंक संग्रही ठेवावा, भेट द्यावा असा असतो. वाचकांनी दीपोत्सववर आपल्या पसंतीची मोहर आधीच उमटवली आहे. एबीसीच्या प्रमाणपत्राने त्याच्यावर औपचारिक शिक्कामोर्तब केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या दिमाखदार सोहळ्याचे प्रास्ताविक करताना लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी देशभरात प्रसिद्ध होत असलेल्या विशेष अंकांचा आढावा घेतला. ते म्हणाले की बंगाल, तमिळ आणि केरळसह अनेक राज्यांत विशेष अंक लाखोंच्या संख्येत प्रकाशित होतात. परंतु मराठी मन आणि साहित्य समृद्ध असतानाही देशातील अन्य भाषिक अंकांपेक्षा मराठीतील दिवाळी अंक तुलनेने मागे असल्याची एक खंत होती. यावर सखोल चिंतन आणि संशोधन केले असता वाचकांना जे हवं ते देण्याची आवश्यकता असल्याचे लक्षात आले. गुलजार, शोभा डे आदी मान्यवरांशी चर्चा करून दीपोत्सवच्या रूपाने नव्या रंगरुपातील आशयघन दिवाळी अंक साकारला. देश आणि विदेशात वसलेल्या मराठी भाषिकांनी या अंकास पसंती तर दिलीच; शिवाय एबीसीने लक्ष प्रतींच्या खपाचे प्रमाणपत्र देऊन गौरवही केला. हा सन्मान केवळ लोकमतचा नसून, तो तमाम मराठी भाषिकांचा असल्याचे विनम्रपूर्वक सांगितले. शेवटी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे आभार मानले. राज्यपालांचा मराठी बाणाराज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राजभवनसारखी देखणी वास्तू सामान्य जनतेसाठी खुली केली. शिवाय राजभवनची इंग्रजी पाटी मराठी भाषेत लावून आपला मराठी बाणा दाखविला. यासाठी राज्यपालांचे विशेष अभिनंदन करायला हवे, असे लोकमत वृत्तसमूहाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले. दीपोत्सवाचा हा कार्यक्रम दुपारी चार वाजता सुरू झाला आणि नियोजित वेळेत म्हणजे पाच वाजता संपला. मुख्य कार्यक्रमानंतर चहापानाच्या वेळी ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे संयोजक व गायक अशोक हांडे राज्यपालांना म्हणाले, की लोकमतला हा कार्यक्रम एखाद्या पंचतारांकित हॉटेलात घेता आला असता, परंतु राजभवनात कार्यक्रम घेऊन मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने गौरव केला आहे. राज्यपालांनी त्यास दाद दिली.उपस्थित मान्यवर : या अविस्मरणीय सोहळ्यास राज्यसभा सदस्य अॅड. माजिद मेनन, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. राज पुरोहित, आ. प्रताप सरनाईक, भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी, भाजपा खजिनदार शायना एनसी, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मनसेचे नितीन सरदेसाई, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, संजय घोडावत, सज्जन जिंदाल, वेणुगोपाल धूत, भरत शहा आदी प्रसिद्ध उद्योगपती, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, महसूल खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खरगे, एमटीडीसीचे एमडी पराग जैन, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, सांस्कृतिक खात्याचे सचिव अजय अंबेकर उपस्थित होते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त धनंजय कुलकर्णी, व्हीआयपी सुरक्षाचे पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, फोर्स वनचे पोलीस महानिरीक्षक संंजय सक्सेना, वाहतूक उपायुक्त पंजाबराव उगाले उपस्थित होते. सेल्फीज : ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, रमेश देव, मोहन जोशी, गायक शंकर महादेवन, गायक कैलाश खेर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पूनम धिल्लो, गायक रूपकुमार राठोड, सोनल राठोड, अभिनेता आणि कवी शैलेश लोढा यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. कॉलेजिअन्सचा सहभाग : झेविअर्स, साठ्ये, पोद्दार कॉलेजियन्सची कार्यक्रमाला असलेली हजेरी लक्षणीय ठरली. दिग्गजांना अगदी जवळून पाहून तरुणाईचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महादेवन यांच्या गाण्याने केले मंत्रमुग्ध : सोहळ््याला उपस्थित असलेल्यांच्या स्वागतासाठी गायक शंकर महादेवन यांनी आपल्या आगामी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटातील गाणे सादर केले. गणरायाच्या स्तुतीपर या गाण्याने वातावरण प्रसन्न झाले आणि सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
महाराष्ट्र तर देशाची सांस्कृतिक राजधानी!
By admin | Published: September 17, 2015 3:52 AM