मनोहर कुंभेजकरएकेकाळी कचऱ्यामुळे गलिच्छ किनाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्सोवा किनाऱ्याचे रुपडे पालटणाऱ्या डॉ. अफरोज शाह यांनी समाजसेवेचा नवा आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे. वर्सोव्याचा किनारा स्वच्छ करण्याचे काम गेले अनेक महिने सुरु असून या कामाला समाजाच्या सर्वच स्तरांमधून पाठिंबा मिळत आहे.देशात प्रगतशील असलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांनी आपला महाराष्ट्र कचरामुक्त करण्याचा संकल्प सर्वांनी केला पाहिजे असे ठाम मत अँड.अफरोझ शाह यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले. कचरामुक्तीकडे केवळ इव्हेंट म्हणून न बघता नागरिकांनी आपण स्वतः कचरा करणार नाही आणि इतरांनी कचरा टाकू नये म्हणून त्यांचे प्रबोधन करण्याचा निश्चय केला पाहिजे. त्यासाठी आठवड्यातील शनिवार व रविवारी एकत्र येऊन घरातील कचरा रस्त्यावर टाकू नका आपला परिसर स्वच्छ ठेवा, कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे विघटन करा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा, समुद्र व खारफुटीचे जंगल वाचवून जलसंपत्ती,जलचर प्राणी व पक्षी वाचवण्यासाठी पुढाकार घेऊन आणि वस्ती-वस्तीत जाऊन प्रबोधन केले पाहिजे अशी ठाम भूमिका त्याने मांडली.वर्सोवा गंगाभवन येथे एव्हरेस्ट सोसायटीत राहणाऱ्या आणि पेशाने वकील असलेल्या अँड. अफरोझला घराच्या गॅलरीतून समोर कचरा व प्लास्टिकने भरलेला वर्सोव्याचा समुद्रकिनारा सतत नजरेस पडत होता. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या अफरोझने पुढाकार घेऊन 15 ऑक्टोबर 2015 साली काही स्वयंसेवक आणि वर्सोव्यातील कोळी बांधवाना एकत्र करून वर्सोवा बीच क्लिनिंग मोहिमेचे रोपटे येथे लावले. या मोहिमेचा आता वटवृक्ष झाला असून केवळ देशातच नव्हे तर जगात या मोहिमेचे कौतुक होत असून वर्सोव्याचे नाव अफरोझमुळे जागतिक पटलावर गेले आहे.बघता-बघता या मोहिमेला 132 आठवडे झाले आहेत. दर शनिवारी आणि रविवारी अफरोझ व त्याचे सुमारे 200 स्वयंसेवक हातात हातमोजे घालून येथील कचरा व प्लास्टिक गोळा करतात. याकाळात 1.5 कोटी किलो इतका कचरा वर्सोवा किनाऱ्यावरून गोळा करण्यात आला असल्याची माहिती त्याने दिली. गेल्या सुमारे 1 वर्षांपासून वर्सोवा येथील सातबंगला सागरकुटीर येथील सुमारे 30000 नागरिक व खाडीलगत वसलेल्या 5000 ची लोकवस्ती असलेल्या येथील नागरिकांचे कचरा इतरत्र फेकू नका, घरातील कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करा, आपला परिसर सुंदर व स्वच्छ ठेवा असे कचरामुक्तीसाठी प्रबोधन मी व माझे स्वयंसेवक करत असल्याची माहिती त्याने दिली. तसेच मुंबईतील सुमारे 40000 विद्यार्थी या बीच क्लिनिंगच्या मोहिमेत सहभागी झाले असून दर शनिवारी आणि रविवारी पाळीपाळीने यातील सुमारे 100 विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होत असल्याची माहिती अफरोझ शाह याने दिली.प्लास्टिक बंदीचा कायदा जरी राज्य सरकारने गेल्या गुढीपाडव्यापासून केला असला तरी अजून याची अंमलबजावणी सुरू झाली नाही. संपूर्ण प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्यापेक्षा प्लास्टिक पिशव्या,थर्माकोल व प्लास्टिक स्ट्रॉ यावर बंदी घातली पाहिजे. प्लास्टिकचे पुनर्चक्रीकरण करण्याची आणि रस्त्यावर टाकलेल्या चॉकलेट व अन्य पदार्थांवरील प्लास्टिकचे आवरणे हे गोळा करण्याची जबाबदारी प्लास्टिक उद्योजकांनी उचलली पाहिजे असे मत त्याने व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफरोझच्या मोहिमेचे आपल्या मन की बात या कार्यक्रमात कौतुक केले होते, तर युनायटेड नेशनने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून चॅम्पियन ऑफ द अर्थ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविले असून असा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय आहे. अफरोझ याच्या बीच क्लिनिंग मोहिमेचे अनुकरण करून युनायटेड नेशनने देखिल आता त्यांच्या भागातील बीच क्लिनिंगची मोहीम हाती घेतली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी तर स्वतःच्या बँकेच्या खात्यातील 70 लाख रुपये खर्च करून अफरोझ च्या बीच क्लिनिंगसाठी अलिकडेच सुमारे 70 लाखांची यंत्रसामुग्री देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर देखिल त्याच्या या मोहिमेच्या मागे मदतीसाठी उभ्या आहेत. वर्सोवा भूषण पुरकार सलग दोन वर्षे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अफरोझला देण्यात आला होता.1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून मोठ्या दिमाखात आपण सर्व साजरा करतो. मी महाराष्ट्रात तेही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीतील वर्सोवा येथे राहतो याचा मला अभिमान असून उद्याच्या महाराष्ट्र व कामगार दिनानिम्मित या महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सर्व राज्यातील नागरिकांनी या दिनानिमित्त बीच क्लिनिंगचे जनक अँड.अफरोझ शाह यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Maharashtra Day: समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छ करणारे अॅड. अफरोझ शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 7:55 AM