Ajit Pawar Covid 19 Positive: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: यासंबंधीचे ट्वीट करून माहिती दिली. अजित पवार यांनी रविवारी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे, असे अजित पवार यांनी सांगितलं. महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती एकदम चांगली आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजितदादा औषधोपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात एकनाथ शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडी असा सत्ता संघर्ष सुरू असताना कोरोनावर मात करून लवकरच कामावर परतण्याची इच्छा अजितदादांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, अजित पवार यांच्या संपर्कात गेल्या काही दिवसात जे लोक आले आहेत, त्यांनी कोणतीही लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्लादेखील अजित पवार यांनी दिला आहे.
"काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी", असे ट्वीट करत अजित पवार यांनी कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.
दरम्यान, नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन राजभवनात परतले. गेल्या आठवड्यात बुधवारी कोश्यारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर कोश्यारी यांचे वय व प्रकृती लक्षात घेता त्यांच्यावर राजभवनात उपचार न करता अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाबाधित असताना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच कोश्यारी हे कोरोनावर मात करून ठणठणीत होऊन राजभवनावर परतले.