पंढरपूर : पंढरपुरातील चंद्रभागा नदीपात्राजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या घाटाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. कामासाठी काळी माती वापरण्यात आली असून याकामी अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे. यामुळे सहाजणांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंढरपूर येथे दिले.
चंद्रभागा नदीच्या तीरावर असलेल्या कुंभार घाटा शेजारी नव्याने बांधण्यात आलेल्या घाट कोसळला. या घाटाच्या भरावाखाली दबून सहा जणांचा मृत्यू झाला होता. पंढरपुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पवार यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ६२३ गावे पुराने बाधित झाली आहेत. एक लाख ४५ हजार २३३ हेक्टरवरील खरीप पिके बाधित झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. २९ हजार ९१४ हेक्टर वरील फळबागादेखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. तीन दिवसात महावितरणचे दीड हजार विजेचे खांब कोसळले. ३० वीज उपकेंद्रे व ८ हजार ७०७ रोहित्रे बंद पडली आहेत. चंद्रभागेचा पूर ओसरला असून पंढरपुरातील तीनही पूल खुले झाले आहेत.