Devendra Fadanvis: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा आज शेवट झाला. राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली. तसेच, स्वतः सत्तेतून बाहेर राहण्याचा निर्णयही फडणवीसांनी घेतला. पण, केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना सत्ते राहण्याचे आणि उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे निर्देश दिले आहेत.
'फडणवीसांनी मोठ्या मनाने...'भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यातून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्विकारुन सत्तेत राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या व्हिडिओत जेपी नड्डा म्हणतात की, ''महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी मोठ्या मनाने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आमच्या नेत्याचे चरित्र दिसून येते. आम्हाला पदाची लालसा नाही, हे यातून स्पष्ट होते,'' असे नड्डा म्हणाले.
पक्षाचे फडणवीसांना निर्देशते पुढे म्हणतात की, ''आम्ही विचारांचा लढाई लढत आहोत आणि विचारांना पुढे नेण्यासोबतच महाराष्ट्रातील जनतेचा विकास, त्यांच्या हिताची कामे पूर्ण व्हावी, यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी हा मोठा निर्णय घेतला. पण, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना वैयक्तिकरित्या विनंती केली असून त्यांन महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारावा, असे केंद्रीय नेतृत्वाने निर्देश दिले आहे," अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली. त्यांमुळे आता देवेंद्र फडणवीसदेखील एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची दाट शक्यता आहे.