मुंबई : देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणाºया शरद पवार यांनी महाराष्ट्राला इतके काही दिले की त्याची मोजदाद करता येणार नाही. राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान मिळवून देणारे हे व्यक्तिमत्व. पण, महाराष्ट्राने या व्यक्तिमत्त्वाची त्याप्रमाणात कदर केली नाही. त्यांना त्या सन्मानापर्यंत (पंतप्रधान पदापर्यंत) पोहोचवले नाही. त्यांना अपयश दिले, अशी खंत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.शरद पवार तसेच गणपतराव देशमुख यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधान परिषदेत या दोन्ही नेत्यांचा गौरव करणारा ठराव संमत करण्यात आला. त्यावर निंबाळकर बोलत होते. शरद पवार व गणपतरावांचा विधिमंडळात राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या उपस्थितीत गौरव करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी केली.राजकारणात यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर राहिलेले शरद पवार यशवंतरावांबरोबर काँग्रेसमध्ये परत गेले नाहीत. हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारचे मुख्यमंत्री पवार यांना राजधानी दिल्लीत बोलावले. संजय गांधी यांच्याबरोबर काम करावे, अशी सूचना इंदिराजींनी केली. पण, पवार यांनी धाडस दाखवत काँग्रेसमध्ये परतण्यास नकार दिला. त्यामुळे दुसºयाच दिवशी त्यांचे सरकार बरखास्त झाल्याची आठवण तटकरे यांनी करून दिली.गणपतराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना हे संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास असलेले चालते बोलते विद्यापीठ आहे असे गौरोवोद्गार मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी काढले. देशमुख यांची धेयनिष्ठा, तत्वनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा हा गौरव असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र आणि देशाचे राजकारण, समाजकारण, क्रीडा, साहित्य सर्वच क्षेत्रातील शरद पवार यांचे कार्य प्रत्येकाला अभिमान वाटावा असे आहे, असे गौरवोद्गार काँग्रेस सदस्य नारायण राणे यांनी काढले. या देशातील युवकांसाठी त्यांचे जीवन मार्गदर्शक ठरणारे आहे. शरद पवार म्हणजे या देशातील राजकारण आणि विकासाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत. एकाच वेळी इतक्या क्षेत्रात काम करणारे पवार म्हणजे पीएचडीचा विषय आहे, असेही राणे म्हणाले.उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कपिल पाटील, जोगेंद्र कवाडे, नीलम गोºहे आदींनी या प्रस्तावाला पाठिंबा देताना आपले विचार मांडले.
महाराष्ट्राने पवारांना तो सन्मान दिला नाही, रामराजे नाईक निंबाळकर यांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 4:15 AM