नितीन अग्रवाल, नवी दिल्लीहिंदूकुश पर्वताच्या भागात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने दिल्लीसह उत्तर भारताच्या मोठ्या भागाला हादरून सोडले असले तरी महाराष्ट्राला कोणताही धोका नाही. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या काही भागाला संवेदनशील मानले; मात्र भूगर्भीय हालचालींच्यादृष्टीने ही स्थिती सर्वात कमी धोकादायक मानली जाते.भूकंपाचा धोका पाहू जाता देशाला चार झोनमध्ये विभाजित करण्यात आल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे दस्तऐवज सांगतात. यातील पाचवा झोन सर्वाधिक धोकादायक असून, दुसऱ्या झोनला कमी धोकादायक मानले जाते. > संवेदनशील १०७ शहरांच्या यादीत मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणेही...भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) अहवालात भूकंपाबद्दल संवेदनशील अशा १०७ शहरांची यादी तयार करण्यात आली असून त्यात मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, तारापूर आणि ठाणे या शहरांचा समावेश आहे. ही शहरे कमी संवेदनशील अशा दुसऱ्या आणि तिसऱ्या झोनमध्ये येत असल्यामुळे भूकंपाचा धोकाही कमी आहे. बीआयएसने महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीच्या काही भागाला धोकादायक अशा झोन चारमध्ये ठेवले आहे. या झोनमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचल, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगालचा उत्तर भाग, गुजरात आणि राजस्थानचा समावेश आहे> सर्वाधिक धोकादायक झोनमध्ये जम्मू-काश्मीर, हिमाचलजम्मू-काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड, गुजरातचे रण (कच्छ), उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान-निकोबार बेटाचा समावेश सर्वाधिक धोकादायक अशा झोन पाचमध्ये आहे. केरळ, गोवा, लक्षद्वीप, पंजाबचा काही भाग, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, प. बंगाल, राजस्थानसह उर्वरित भाग कमी धोकादायक अशा झोन तीन आणि दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. भूकंपाच्या संकट निर्देशांकाची गणना भूवैज्ञानिक आणि भूआकृतिविज्ञानासह एकूण ७ मानकांच्या आधारे करण्यात आली आहे. बीआयएसने भूकंपामुळे इमारतींना होणारा धोका टाळण्यासाठी भूकंपविरोधी इमारतींचे डिझाईन तयार केले आहे. सध्याच्या इमारतींना भूकंपरोधक बनविण्यासाठी रिट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्राला विनाशकारी भूकंपाचा धोका नाही
By admin | Published: April 11, 2016 2:39 AM