राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत येण्यासाठी निघाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला आहे. थोड्याच वेळात फडणवीस ताजमध्ये भाजपाच्या आमदारांसोबतच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. यातच बहुमत चाचणी कधी होणार, यावरून पडदा हटला आहे.
राज्यपालांनी बोलविलेले विशेष अधिवेशन काहीसे पुढे ढकलण्यात आले आहे. आता तीन आणि ४ जुलै रोजी हे अधिवेशन होणार आहे. यात तीन जुलै रोजी विधान सभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि ४ जुलै रोजी शिंदे सरकारला फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे.
दाबोळी विमानतळावरून मुंबईकडे निघताना बहुमत चाचणी सहजपणे पार करू शकेन, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच भाजपाचे १२० आमदार आणि शिवसेनेचे ५० आमदार असे १७० एवढे बहुमत असल्याचे ते म्हणाले. यामुळे विधान सभा अध्यक्ष देखील सहज जिंकतील.
गुवाहाटीवरून गोव्याला गेलेले बंडखोर आमदार शनिवार, २ जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.