Opinion Poll: भाजपाचीच 'दिवाळी'; तब्बल ४८ टक्के मतदारांचा कौल 'कमळा'ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 05:25 PM2019-10-18T17:25:11+5:302019-10-18T17:39:06+5:30
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदारांचा धक्का
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मतदानाला अवघे दोन दिवस राहिल्यानं सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. याच पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणातून राज्यात भाजपाची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तब्बल ४८.८ टक्के मतदारांना भाजपाचीच सत्ता येईल, असं वाटतं. विशेष म्हणजे मतदारांना सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता अतिशय धूसर वाटते. एबीपी माझानं हे सर्वेक्षण केलं आहे.
भाजपाला जवळपास निम्म्या मतदारांनी कौल दिलेला असताना शिवसेनेला केवळ ९ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. काँग्रेसची सत्ता येईल, असं मत १०.६ टक्क्यांनी व्यक्त केलं आहे. तर राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते, अशी शक्यता ११.३ टक्क्यांनी व्यक्त केली आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या व्यतिरिक्त इतरांची सत्ता येईल, असा अंदाज ११.३ टक्क्यांनी व्यक्त केला आहे. तर ८.९ टक्के मतदारांनी सांगता येत नाही, असं म्हणत यावर बोलण्यास नकार दिला आहे.
भाजपाची सत्ता येईल, असं मत ४८ टक्के मतदारांनी व्यक्त असलं तरी ५४.५ टक्के मतदारांना मुख्यमंत्री बदलला जावं असं वाटतं. तर ४४.७ टक्के मतदारांनी मुख्यमंत्री बदलण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातलं सरकार तातडीनं बदललं जावं, असं वाटणाऱ्या मतदारांचं प्रमाण ५५ टक्के इतकं आहे. तर सरकार बदलण्याची गरज नसल्याचं मत ४४.६ टक्के लोकांनी वर्तवलं आहे.