मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकालात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार हे स्पष्ट झालं आहे. पण महायुतीच्या ६ दिग्गज मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात ९९ च्या वर जागा मिळविल्या आहेत. तर यामध्ये कर्जत जामखेड मतदारसंघावर सगळ्यांचे लक्ष लागलं होतं.
कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपाचेराम शिंदे यांना राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी पराभव केला आहे. पवार घराण्यातील तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात सभा घेतली होती. यामध्ये तुम्ही राम शिंदे यांना निवडून दिलं तर त्यांना आणखी चांगलं कॅबिनेट देऊ तसेच कर्जत जामखेडमध्ये बाहेरून आलेले पार्सल परत पाठवा असं विधान केलं होतं. मात्र रोहित पवारांनी राम शिंदे यांना कडवी झुंज देत हा मतदारसंघ भाजपाकडून खेचून आणला आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना १ लाख ३४ हजार ८०० मते दिली तर राम शिंदे यांना ९१ हजार ८१५ मते दिली. महाराष्ट्रात सत्ताधारी असो वा विरोधक यांच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी राजकीय नेते खुल्या मनाने एकमेकांना शुभेच्छा देत असतात. विजयी झाल्यानंतर रोहित पवार कुटुंबीयांसह भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांच्या भेटीला गेले. यावेळी राम शिंदे यांनी विजयी उमेदवार रोहित पवार यांचा फेटा बांधून शुभेच्छा दिल्या.
याचप्रकारे लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी विजयी झाल्यानंतर पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील ही राजकीय संस्कृती पुन्हा एकदा रोहित पवारच्या कृत्यातून दिसून आली आहे.
पाहा व्हिडीओ