Maharashtra Election 2019 : मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोटदुखी, जतमध्ये अमित शहांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 01:48 PM2019-10-10T13:48:11+5:302019-10-10T13:49:26+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेल लगावला.
जत (सांगली) - पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला, भाजपाध्यक्षअमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेल लगावला. तसेच राज्यात 15 वर्षे केलेल्या कारभारावरूनही अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना केंद्रात 10 वर्षे आणि राज्यात 15 वर्षे सत्तेत असताना काय केले, याचा हिशेब शरद पवार यांनी द्यावा, असे आव्हान अमित शहा यांनी दिले.
''पूर्वी पंतप्रधानांनी परदेश दौरा केला तरी कुणाला कळतही नसे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात. तेव्हा तेथील लोक त्यांचे थाटात स्वागत करतात. मोदी मोदी अशा घोषणा दिल्या जातात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत आहे. पण मोदी मोदीच्या दिल्या जाणाऱ्या घोषणा हा काही मोदींचा किंवा भाजपाचा सन्मान नाही. तर तो या देशातील सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान आहे, असे अमित शहा म्हणाले.
दरम्यान, आज जत येथे झालेल्या सभेत अमित शहा यांनी पुन्हा एकदा कलम 370 चा उल्लेख केला. 70 वर्षांनंतर कलम 370 हटवण्यात यश आले. कलम 370 हटवल्यामुळे काश्मीरमधील जनता आता शांतता अनुभवत आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. तसेच केवळ मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशा निर्णयांना विरोध होत आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी राज्यात फडणवीस सरकारने केलेल्या विविध विकासकामांचाही अमित शहा यांनी आढावा घेतला. तसेच जतमधील कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या भागामधील गावांमध्ये असलेला पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच येडियुरप्पा यांनीही या दुष्काळग्रस्त गावांना पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.