महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 09:48 PM2019-11-14T21:48:47+5:302019-11-14T22:08:42+5:30
राज्याच्या राजकारणावर बोलताना गडकरींचं विधान
मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात काहीही घडू शकतं. आपण सामना गमावत आहोत, असं कधी कधी वाटू लागतं. मात्र त्यानंतर वेगळाच निकाल समोर येतो, अशा शब्दांमध्ये केंद्रीय भूपृष्ठमंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींनी राज्यातल्या सद्यस्थितीवर भाष्य केलं. मात्र राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मला कल्पना नसल्याचं ते म्हणाले. भाजपानं राज्यात सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनं सरकार स्थापनेच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण आणि सूचक मानलं जातं आहे.
#WATCH "Anything can happen in cricket and politics. Sometimes you feel you are losing the match, but the result is exactly the opposite. Also, I have just arrived from Delhi, I don't know the detailed politics of Maharashtra,"Union Min Nitin Gadkari on Maharashtra govt formation pic.twitter.com/JB6cfeMRok
— ANI (@ANI) November 14, 2019
मुंबईतील एका कार्यक्रमात नितीन गडकरींना सत्ता स्थापनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तुमचा प्रश्न योग्य आहे. मात्र तो तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारला आहे, असं गडकरी म्हणाले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सहभागी असलेले नेतेच यावर भाष्य करू शकतात, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. या प्रश्नावर बोलताना त्यांनी क्रिकेटचा संदर्भ देत सूचक भाष्य केलं. 'राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधी कधी तुम्हाला वाटतं, तुम्ही सामना गमावत आहात. पण सामनाचा निकाल बरोबर उलट लागतो,' असं गडकरी म्हणाले.
Union Min Nitin Gadkari on being asked what will happen to ongoing infrastructure projects in Mumbai if Maharashtra gets a non-BJP govt:Govts change,but projects continue.I see no problem with it. Be it BJP,NCP or Congress,any party which forms govt will support positive policies pic.twitter.com/E35mybghxM
— ANI (@ANI) November 14, 2019
मी आताच दिल्लीहून आलोय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणार नाही. दिल्लीत सक्रीय असल्यानं मला राज्याच्या राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे राज्यात कोणाचं सरकार येईल, याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही, असं गडकरी म्हणाले. राज्यात भाजपा व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचं सरकार आल्यास विकासकामांवर परिणाम होईल का, असा प्रश्न यावेळी उपस्थितांपैकी एकानं गडकरींना विचारला. त्यावर सरकारं बदलत असतात. पण प्रकल्प सुरूच राहतात. त्यामुळे त्यात समस्या येणार नाहीत. राज्यात कोणतंही सरकार आलं. मग ते भाजपाचं असो, काँग्रेसचं असो, राष्ट्रवादीचं असो किंवा मग शिवसेनेचं असो, ते सकारात्मक आणि विकासाच्या धोरणांना आणि मोठ्या प्रकल्पांना सहकार्य करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.