मुंबई - वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्वच मतदारसंघात उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शपथपत्रामध्ये संपत्तीचं विवरण दिलंय. वंचित बहुजना आघाडीच्या एका उमेदवाराची संपत्ती तब्बल 176 कोटी रुपये आहे. त्यामुळे हा उमेदवार वंचित कसा?असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण, दिग्गज नेत्यांपेक्षाही अधिक संपत्ती या उमेदवाराची आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केलेल्या राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपाने तुळजापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यापूर्वी तुळजापूरचा गड नेहमीच शिवसेनेकडे होता. मात्र, यंदा प्रथमच युतीच्या जागावाटपात तुळजापूर मतदारसंघ भाजपाला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे आमदार मधुकर चव्हाण रिंगणात आहेत. वयाच्या 82 व्या वर्षीही आठव्यांदा चव्हाण विधानसभा लढवत आहेत. यापूर्वी सलग चारवेळा ते तुळजापूरमधून निवडूण आले आहेत. तुळजापूर मतदारसंघात यंदाही मधुकर चव्हाण विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असाच सामना रंगणार आहे. मात्र, यासोबतच तुळजापूर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या उमेदवाराचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या संपत्तीची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. अशोक जगदाळे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 49 कोटी 88 लाख 87 हजार 829 रुपये एवढी आहे. तर, त्यांच्या पत्नीची मालमत्ता 126 कोटी 49 लाख 2 हजार 880 रुपये आहे. 52 लाख रुपयांच्या मर्सिडीजसह अनेक गाड्यांचा समावेश यामध्ये आहेत. तसेच जगदाळे यांच्याकडे 88 लाख रुपयांचे दागिने आहेत. त्यामुळे जगदाळेंच्या संपत्तीची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. जगदाळे हे उद्योजक असून पुण्यामध्ये त्यांचा व्यवसाय आहे. वंचित बहुजन आघाडीने तुळजापूर मतदारसंघातून अशोक जगदाळे यांनी उमेदवारी दिल्यानंतर वंचितच्या वर्तुळातही यांची चर्चा रंगली. पीडित आणि वंचितांना घेऊन आपला गड उभारणारी वंचित बहुजन आघाडीने अब्जाधिश उद्योजकाला उमेदवारी दिल्याने ही घाघाडी घरच वंचितांचा राहिल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.