महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसताना, भाजपानं आज एक पाऊल पुढे टाकत, 'आधी बसू, मग बोलू', अशी ऑफर शिवसेनेला दिली आहे. आम्ही रोज शिवसेनेला संपर्क साधतोय, परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केला. जनमानसांत भाजपाची चुकीची प्रतिमा जाऊ नये, या उद्देशानेच त्यांनी हे पाऊल उचलून शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे.
जे ठरलंय त्याप्रमाणे करा, वेगळ्या प्रस्तावाची गरज नाही - संजय राऊत
कोणत्याही क्षणी गोड बातमी येऊ शकते; सुधीर मुनगंटीवार यांचं सूचक विधान
सर्व विषयांवर चर्चेतून मार्ग काढू, असा समंजसपणा भाजपाने दाखवला असला, तरी मुख्यमंत्रिपदावर कुठलीही तडजोड होणार नाही, हा त्यांचा पवित्रा कायम आहे. वास्तविक, ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवंच, या मुद्द्यापासून शिवसेना मागे हटायला तयार नाही. त्यावरूनच चर्चेचं घोडं अडलं आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत जे होऊ शकलं नाही, ते भाजपाच्या चर्चेच्या आवाहनानंतर होईल का, याबद्दल शंकाच आहे.
शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दारं २४ तास खुली; भाजपाने माघारीची शक्यता 'शत-प्रतिशत' फेटाळली!
आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची!
भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. त्यानंतर, गिरीश महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीकडे आपली सविस्तर भूमिका मांडली. या बैठकीनंतर महायुतीचंच सरकार येणार, अशा ठाम विश्वास नेतेमंडळी व्यक्त करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, इतक्या दिवसांनी प्रथमच भाजपाचे नेते शिवसेनेला चर्चेचं आवताण देताना दिसले. त्याबद्दल विचारलं असता गिरीश महाजन यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. निकाल लागल्यापासून सातत्याने भाजपाकडून शिवसेनेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यांच्याकडून प्रतिसादच मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना रोज माध्यमांसमोर येऊन बोलत असताना, सत्तास्थापनेसाठी भाजपाकडून काहीच प्रयत्न होत नाहीत, असं जनतेला वाटू नये, या हेतूनेच आम्ही आज जाहीरपणे त्यांना चर्चेचं आवाहन करत आहोत, असं त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री पाच वर्षांसाठी भाजपाचाच असेल, यावर आम्ही ठाम आहोत. परंतु, त्याबाबतही समोरासमोर बसून चर्चा होणं अधिक सयुक्तिक वाटतं. आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत, असं ते म्हणत आहेत. इकडे-तिकडे जाऊन भेटत आहेत. पण जनतेनं एका विचारधारेला मतदान केलंय. त्यामुळे आम्ही तसं पाप करणार नाही. मोठ्या भावाच्या भूमिकेतून, चर्चेद्वारे मार्ग काढावा, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं महाजन यांनी सांगितलं. दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असंही ते आवर्जून म्हणाले.