मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत. निकालामध्ये कोणता पक्ष किती जागा मिळविणार हे गुरुवारी स्पष्ट होणार आहे. मात्र शिवसेनेने प्रत्येक जागा जिंकण्यासाठी लढली आहे. अबकी बार १०० पार हे ध्येय शिवसेनेचे होते. शिवसेना-भाजपा २०० च्या वर जाणार हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. शिवसेना १०० जागांवर विजयी होणार आहे. भाजपाला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना-भाजपाला बहुमत मिळणार हे चित्र होतं. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री म्हणतात तसे वंचित बहुजन आघाडी राहील. उद्या निकालाचं चित्र स्पष्ट होईल, वेळोवेळी पोल घेण्याची गरज नाही. महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय पर्याय नाही, आम्ही एकत्र निवडणूक लढलो तर बहुमत एकत्रच असणार असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाल्यास शिवसेनेला सत्तेत वाटा देणार नाही अशी चर्चा आहे त्यावर तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना हे प्रत्येक पक्षाला लागू होतं. सत्ता म्हणजे सर्वोच्च नाही, उद्याचे निकाल लागल्यावर शिवसेना काय आहे हे कळेल. राज्यातील जनता सुज्ञ आहे, युतीत आम्ही निवडणुका लढलो आहे तर सत्तेतही एकत्र राहणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या पाळल्या जातील. राजकारणात शब्दाला किंमत असते, शिवरायांचे नाव घेऊन खोटं बोलता येत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं आहे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखविणार हे स्वप्न सगळे शिवसैनिक मिळून एकत्र पूर्ण करणार आहोत. त्याचसोबत महाराष्ट्रातलं कमी मतदान हे दुर्दैवाची गोष्ट आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारं नाही. शहरांना शहाणपणाचं लेबल लागलं आहे. मतदान कमी होणं हे चित्र चांगले नाही, राज्यकर्ते का कमी पडतायेत याचा विचार करायला हवा. मतदान हा सगळ्यांचा अधिकार आहे. मग तो कोणताही सेलिब्रिटी असो वा गावखेड्यातला सामान्य माणूस, मत देण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतो असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे.