मुंबई: भाजपाने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन भाजपा सरकारने दिलं होतं. मात्र सत्तेत येताच केवळ ३१% शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली गेली, मग बाकी ६९% शेतकऱ्यांचा विचार हे सरकार कधी करणार? याचे उत्तर देण्याची ताकद या सरकारमध्ये नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशिममध्ये प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत केलं आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची या सरकारची इच्छा नाही. मात्र देशाचे अर्थमंत्री ८० हजार कोटींची गुंतवणूक कॉर्पोरेट क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतात. याचा अर्थ या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही, फक्त उद्योगपतींची काळजी असल्याचे सांगत भाजपा सरकारवर निशाणा साधाला आहे.
उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्याने एका मुलीवर अत्याचार केला. भाजपा सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेऊन आम्ही सत्तेत आलो असे भाजपा सरकार सांगते, मग हे सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पाठिशी कशी घालते? असा प्रश्न देखील शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच राजकीय पक्ष प्रचाराला लागले असताना शरद पवारांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा मतदारसंघातील उमेदवार प्रकाश डहाके रिसोड (वाशिम) येथील काँग्रेसचे उमेदवार अमित झनक आणि वाशिमच्या उमेदवार रजनी राठोड यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत उपस्थितांना संबोधित केले.