मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटत आले तरी अद्याप महायुतीला सत्ता स्थापन करता आलेली नाही. शिवसेना, भाजपाला अद्याप सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आलेला नाही. राज्याच्या राजकारणात आज घडत असलेल्या घडामोडी पाहता पुढील काही दिवस सरकार स्थापनेचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लवकरच सत्ता स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. पाटील यांच्यासह भाजपा मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला जनादेश दिला आहे. मतदारांनी सरकार स्थापनेसाठी कौल दिला आहे. महायुतीचं सरकार व्हावं ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर सांगितलं. या बैठकीत भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नसल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ता स्थापनेसाठी जास्त वेळ लागत असल्यानं राज्यपाल महोदयांशी कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केल्याची माहिती पाटील यांनी दिली. राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. आता राज्यपालांशी झालेल्या चर्चेच्या आधारे पुढे काय करायचं याचा निर्णय घेतला जाईल, असं पाटील म्हणाले.राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीवेळी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत भाजपानं दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. त्यावेळी सत्तापदांच्या समान वाटपाचा शब्द भाजपाकडून देण्यात आला होता. मात्र आता भाजपानं शब्द फिरवला आहे. भाजपा मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्धव यांनी भाजपाच्या कोर्टात चेंडू ढकलल्यानं सत्ता वाटपाचा तिढा कायम राहण्याची चिन्हं आहेत.
महाराष्ट्र निवडणूक 2019: ...म्हणून राज्यपालांची भेट घेतली; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 2:52 PM