मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा घोळ संपला, सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले, मात्र या सर्वामध्ये भाजपाच्या तिकीट वाटपावरुन झालेला गोंधळ सगळ्यांनाच पाहायला मिळाला. भाजपाने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गजांचे तिकीट कापून त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तीला उमेदवारी दिली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अनेक दिग्गजांचे पत्ते कापल्याने चर्चेला उधाण आलं आहे. पूर्वीप्रमाणे भाजपात समन्वय राहिलेला नाही, अगोदर तिकीट कापताना समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेतलं जायचं पण आता तसं होताना दिसत नाही अशी खंतच प्रकाश मेहता यांनी बोलून दाखविली. गेली 6 टर्म घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता निवडून येत होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रकाश मेहतांचे तिकीट कापून नगरसेवक पराग शहा यांना संधी देण्यात आली आहे.
आपल्या तिकीट का दिलं नाही? आमची काही चूक झाली का? असा प्रश्नच तिकीट कापलेल्या नेत्यांसमोर उभा राहिला आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यात येणार आहे याबाबत थोडीही कल्पना या नेत्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळेच की काय या नेत्यांची खंत आता समोर येऊ लागली आहे. तिकीट द्यायचं नव्हतं तर किमान आम्हाला विश्वासात तरी घ्यायचं असे हे नेते बोलू लागले आहेत. तसेच पक्षाने घेतलेला निर्णय आहे तो मान्य करत निवडणुकीनंतर यासर्व गोष्टींची कारणमीमांसा करण्यात येईल असं विनोद तावडे आणि प्रकाश मेहतांनी सांगितलं आहे.
याबाबत बोलताना प्रकाश मेहतांनी सांगितले की, तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखाद्याला थांबावायचं झालं अथवा दुसरी जबाबादारी घ्यायची असेल तर पूर्वी सांगितले जात होते. पण आता तिकीट कापलं जात असेल त्याबाबत काहीच कल्पना दिली जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
असचं काहीसं मेधा कुलकर्णी यांच्याबाबत घडलं. कोथरुडमधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षाचा निर्णय आहे, हे सांगतानाच, हा निर्णय कळवण्याचं सौजन्यही न दाखवल्यानं मेधा कुलकर्णी भावूक झाल्याचं 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत पाहायला मिळालं होतं.
तसेच विनोद तावडे यांचेही तिकीट कापण्यात आलं. मला उमेदवारी का नाही यात माझी काही चूक की पक्षाची काही चूक झालीय, याचं विश्लेषण करण्याची ही वेळ नाही. मी अमित शाहांशी यासंदर्भात नक्कीच चर्चा करेन. मी विरोधी पक्षनेता झालो, त्यानंतर मंत्री झालो. बरेच जण आमदार पण नाहीत आणि मंत्री पण नाहीत तरीही पक्षाचं काम करतायत. संघाच्या विद्यार्थी परिषदेत असल्यापासून समाजाच्या हिताचं काम करण्याची शिकवण नेहमीच दिली गेली आहे. मला उमेदवारी न देण्याची काही कारणं नक्कीच असतील, पण निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष नेतृत्वाशी बोलता आलेलं नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वावर काही वेळा विश्वास ठेवावा लागतो अशा शब्दात हताश प्रतिक्रिया तावडेंनी व्यक्त केली आहे.