मुंबई: राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी भाष्य केलं आहे. महायुतीची सत्ता आल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असं मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा जाहीर सभेत म्हटलं होतं. मात्र त्यावेळी कोणीही त्याबद्दल आक्षेप का नोंदवला नाही, असा प्रश्न शहांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विचारला आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल त्यावेळी काहीच न बोलणारे आता नव्या मागण्या घेऊन येत आहेत. मात्र त्या आम्हाला अमान्य आहेत, असं शहा म्हणाले आहेत. त्यामुळे युतीमध्ये निर्माण झालेली दरी आणखी रुंदावण्याची शक्यता आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी शिवसेनेकडून निवडणूक निकालानंतर करण्यात आली. यानंतर शिवसेना, भाजपामधील वाद विकोपाला गेला. मात्र तसं कोणतंही आश्वासन शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं, असं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं. एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शहांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींसह देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अनेकदा मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा प्रचारसभांमध्ये उपस्थित केला. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील, असं मी आणि मोदींनी जाहीरपणे म्हटलं होतं. मुख्यमंत्रिपदावर आता दावा करणाऱ्यांनी त्यावेळी यावर कोणताही आक्षेप का घेतला नाही, असा सवाल शहांनी उपस्थित केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवसेना, राष्ट्रवादीला बहुमताचा दावा करण्यासाठी कमी कालावधी दिला, असा आरोप दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. त्यावर भाष्य करताना याआधी कोणत्याही राज्यात राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी १८ दिवस दिले नव्हते, असं शहा म्हणाले. विधानसभेचा कालावधी संपताच राज्यपालांनी बहुमताचा दावा करण्यासाठी पक्षांना निमंत्रण दिलं. मात्र ना शिवसेना बहुमताचा दावा करू शकली ना काँग्रेस-राष्ट्रवादी. आताही कोणत्याही पक्षाकडे बहुमत असल्यास ते राष्ट्रपतींकडे जाऊ शकतात, असं शहा यांनी म्हटलं. राज्यपालांनी कोणालाही संधी नाकारली नाही. त्यामुळे कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलाचा दावा हास्यास्पद वाटतो, असं शहा म्हणाले.