मुंबई: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर सोमवारी राज्यात मतदान होईल. यामध्ये महाराष्ट्राची जनता महायुतीच्या बाजूनं कौल देईल, असा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. महायुतीमधील भाजपाची कामगिरी या निवडणुकीत आणखी सुधारेल आणि त्यांना १३४ जागांवर यश मिळेल, असा अंदाज आहे. तर शिवसेनेचे उमेदवार ६० जागांवर विजयी होऊ शकतात. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही राज्यात महाआघाडीला ९० चा आकडा गाठण्यातदेखील अपयश येईल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १२२ जागा मिळाल्या होत्या. त्या जागा यंदा १३४ वर जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपा यंदा १६४ जागा लढवत आहे. मागील निवडणुकीत ६३ जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला यंदा ६० जागा मिळू शकतात. महायुती जवळपास द्विशतकाजवळ जात असताना महाआघाडी जेमतेम ८६ पर्यंत पोहोचताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत ४२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ४४ जागा जिंकण्याचा अंदाज आहे. तर २०१४ मध्ये ४१ जागांवर विजयी ठरलेली राष्ट्रवादी यंदा ४२ जागा जिंकू शकते. विशेष म्हणजे मुंबईसह सर्वच भागांमध्ये महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे. एकटा मराठवाडा सोडल्यास इतर सर्वच भागांमध्ये महायुतीला नेत्रदीपक यश मिळू शकतं असा अंदाज आहे. मराठवाड्यात महायुती आणि महाआघाडी काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. मात्र तरीही महायुतीलाच जास्त जागा मिळतील, अशी शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे-कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठा विजय मिळू शकतो, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.
विभागनिहाय कुठल्या पक्षाला किती जागा?मुंबई - (एकूण जागा ३६) - महायुती - ३२ महाआघाडी - ४
ठाणे-कोकण - (एकूण जागा ३९) महायुती - ३४ महाआघाडी - ४ इतर - १
मराठवाडा (एकूण जागा ४६)महायुती - २४ महाआघाडी - २० इतर - २
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा ३५)महायुती - २१महाआघाडी - १३ इतर- १
विदर्भ (एकूण जागा ६२)महायुती - ४० महाआघाडी - १९ इतर - ३
प महाराष्ट्र - (एकूण जागा ७०)महायुती - ४३ महाआघाडी - २६ इतर - १