महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस आमदार गोंधळला; आधी म्हणाला कुठलाच दबाव नाही, नंतर म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 12:04 PM2019-11-08T12:04:32+5:302019-11-08T12:04:38+5:30
भाजपाकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू; काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना भाजपाकडून आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपाकडूनकाँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना संपर्क करण्यात आला. भाजपानं फोडाफोडीचं राजकारण बंद करावं, असं म्हणत त्यांनी सर्व आमदारांना फोन रेकॉर्ड करण्याच्या सूचना केल्याची माहिती दिली. मात्र याबद्दल बोलताना आमदार खोसकर काहीसे गोंधळले. आधी आपल्यावर कुठलाच दबाव नसल्याचं म्हणणाऱ्या खोसकरांनी नंतर आपल्याला फोन आल्याचं म्हटलं.
दोन आठवडे उलटूनही सरकार स्थापन करू न शकलेल्या भाजपानं आता फोडाफोडीचं राजकारण सुरू केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 'भाजपाकडून काँग्रेसच्या आमदारांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीच्या आमदारांना काही जणांनी फोन केला होता. मात्र कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार फोडणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवला आहे. त्यामुळे आता कोणी फुटून बाहेर निघण्याचा प्रयत्न केल्यास सर्व विरोधी पक्ष मिळून एकच उमेदवार देऊन त्याला राजकारणातून संपवू. जनतेशी केली जाणारी प्रतारणा खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपाकडून होणारे फोडाफोडीचे प्रयत्न पाहता काँग्रेस आमदारांना फोन टॅप करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली. तुम्हाला येणारे फोन टॅप करा आणि फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना उघडं पाडा, असं आमदारांना सांगितल्याचं वडेट्टीवार म्हणाले. काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांना फोन आल्याचा दावादेखील त्यांनी केला. मात्र याबद्दल भाष्य करताना खोसकर गोंधळले. सुरुवातीला माझ्यावर कोणताच दबाव नाही, असा दावा करणाऱ्या खोसकर यांनी त्यानंतर आपल्याला चर्चेसाठी मुंबईला चला, अशी ऑफर देणारा फोन आल्याचं सांगितलं. आपल्याला आलेला फोन संशयास्पद होता. तो कशासाठी आला असेल, याची तुम्हाला कल्पना असेलच, असं सूचक विधान त्यांनी केलं. आपण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी एकनिष्ठ राहू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.