मुंबई: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी खलबतं सुरू असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. आमची आघाडी होऊ नये यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी चर्चा सुरू आहे. मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं वेळकाढूपणा केला, असं म्हणणं योग्य ठरणार नाही, असंदेखील चव्हाण म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय आल्यावर पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी त्यावर व्यापक चर्चा केली. मात्र शिवसेना एनडीएचा घटक असेपर्यंत याबद्दल चर्चा करणं शक्य नव्हतं. मात्र त्यानंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. यानंतर शिवसेनेसोबत जाण्याबद्दल गांभीर्यानं चर्चा सुरू झाली. आम्ही आमदारांशी संवाद साधून त्यांची मतं सोनिया गांधींना कळवली. त्यानंतर सोनियांनी आम्हाला दिल्लीला बोलावून चर्चा केली. आम्ही त्यांच्यासमोर मतं मांडली. याशिवाय फोनवरदेखील चर्चा केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.शिवसेनेला पाठिंबा देण्याची पत्रं देण्यास झालेल्या विलंबावर त्यांनी भाष्य केलं. शरद पवारांनीदेखील उद्धव ठाकरेंशी अनौपचारिक चर्चा केली होती. मात्र तोवर पाठिंब्याचं पत्र देण्यास उशीर झाला होता. त्यामुळे चर्चा करुन मगच पुढे जाऊ असा निर्णय घेण्यात आला. पवारांनी सोनिया गांधींनादेखील हा सल्ला दिला. सरकार स्थापन झाल्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे चर्चा करुन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सगळ्याला काँग्रेसचा वेळकाढूपणा म्हणणं योग्य ठरणार नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं.
महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 5:22 PM