मुंबई : महायुतीला सत्तेसाठीचा जनादेश मिळालेला असतानाही सत्ता स्थापन करण्यास शिवसेना इच्छुक नसल्याने आम्ही सध्या सरकार स्थापन करू शकत नाही, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भाजपने रविवारी सांगितले. त्यामुळे आता राज्यपालांनी, सरकार स्थापन करण्यास तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा शिवसेनेला केली असून, त्याबाबत सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत कळविण्यास सांगितले आहे. शिवसेनेची मदार आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर असेल. हे दोन पक्ष काय भूमिका घेतात, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, आजवर आम्ही पालखीचे भोई होतो, आता पालखीत आमचाच मुख्यमंत्री बसेल, असे पक्ष आमदारांच्या बैठकीत ठासून सांगितले. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे नवे सत्तासमीकरण होण्यासाठी शिवसेना सर्व शक्ती पणाला लावणार असे दिसते. शिवसेनेला पाठिंबा देण्याची कोणतीही जाहीर भूमिका राष्ट्रवादी वा काँग्रेसने अद्याप घेतलेली नाही. उलट आम्ही विरोधी पक्षातच बसणार असा सूर कायम ठेवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, राज्याची राजकीय परिस्थिती अनिश्चिततेकडून अधिक अनिश्चिततेकडे जात असताना सोमवारी स्थिती स्पष्ट होईल.कोअर कमिटीच्या निर्णयावर अमित शहांचे शिक्कामोर्तबभाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झाली. तीत दिल्लीहून पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. सरकार स्थापन न करण्याचा कोअर कमिटीचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यानंतर फडणवीस व इतर भाजप नेत्यांनी राजभवन गाठले. सध्या वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची, सरकार स्थापण्याची कुठलीही घाई करायची नाही, राष्ट्रवादी वा इतरांच्या मदतीने सरकार स्थापन करायचे नाही, अशी भूमिका कोअर कमिटीत ठरविण्यात आली.राज्यपालांशी भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व इतर मित्रपक्षांच्या महायुतीला सत्तेसाठीचा जनादेश मिळाला होता. त्यानुसार राज्यपालांनी भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून निमंत्रित केले. मात्र, महायुतीला हा जनादेश मिळालेला असूनही त्याचा अनादर करून शिवसेनेने महायुतीत सरकार स्थापन करण्याबाबत इच्छुक नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या भाजप सरकार बनविणार नाही.सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेत भाजपने पद्धतशीर खेळी केली आहे. आता शिवसेना सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दारात जाईल. शिवसेनेची ही भूमिका आतापर्यंत घेतलेल्या भूमिकेच्या अगदी विसंगत अशी असेल. या निमित्ताने शिवसेना उघडी पडेल, हेच भाजपला हवे आहे.विधानसभेत भाजपचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रसचे ४४ आमदार आहेत. भाजपला १२ अपक्ष आमदारांचा तर सेनेला ७ आमदारांचा पाठिंबा आहे.शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार?भाजपच्या नेतृत्वातील एनडीएचा शिवसेना हा घटक पक्ष आहे. या पक्षाचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत हे केंद्रात अवजड उद्योग मंत्री आहेत. राज्यात सरकारसाठी आमचा पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने एनडीएतून बाहेर पडावे, अशी अट राष्ट्रवादीने टाकली आहे. त्यामुळे शिवसेना एनडीएतून कुठल्याही क्षणी बाहेर पडू शकते.>युतीला जनादेश मिळालेला होता. त्या जनादेशाचा अपमान करून शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचे असेल, तर आमच्या त्यासाठी शुभेच्छा आहेत.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप.
महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेस भाजपचा नकार; राज्यपालांचे शिवसेनेला निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 6:14 AM