नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर १५ दिवसांनंतर दिल्लीतील भाजप व काँग्रेसच्या ‘चाणक्यां’च्या हाती राजकारणाची सूत्रे गेली आहेत. भाजपचे ‘चाणक्य’ असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व काँग्रेसचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे खासदार अहमद पटेल यांनी या राजकारणात थेट उडी घेतली आहे.भाजपचे चाणक्य अमित शहा आश्चर्यकारकरीतीने शांत राहिले आहेत. बहुधा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अमित शहा पुढाकार घेऊन भाजपची सत्ता स्थापन करतात; परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत अमित शहा यांनी पुढाकार घेतला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य मानले जात आहे. अखेर अमित शहा हा तटस्थपणा सोडून रविवारी दुपारी सक्रिय झाले. त्यांनी तात्काळ भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्रात पाठविले. अमित शहा मुंबईला गेले नाही, तर त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना मार्गदर्शन केले. पंधरा दिवसांत पहिल्यांदा अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात थेट दखल दिली आहे.काँग्रेस आमदारांचा दबावदुसरीकडे काँग्रेस या राजकीय खेळीत दूर राहण्याचा प्रयत्न करीत होते. सेनेच्या नेतृत्वातील सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिल्यास देशातील प्रतिमेवर काय परिणाम होईल, हा मुख्य प्रश्न काँग्रेस श्रेष्ठींसमोर होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती; परंतु त्यानंतरही काँग्रेसची भूमिका सेनेसाठी सकारात्मक नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसे संकेतही पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिले होते. दोन दिवसांमध्ये काँग्रेस आमदारांचा दबाव वाढल्याने काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांना बाहेर पडावे लागले. त्यांनी जयपूरला जाऊन काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केल्याने सोनिया गांधी यांचीही भूमिका सेनेबाबत मवाळ झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: महाराष्ट्राच्या राजकारणात दिल्लीतील ‘चाणक्य’ सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:51 AM