मुंबई - विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपांचे बाण सोडत आहे. अशातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोथरुडमधून मतदारसंघातून चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित आहेत. विरोधकांनीही त्यांना घेरण्यासाठी कोथरुडमध्ये मनसे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठबळ दिलं आहे.
चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा वाद या मतदारसंघात आहे. भाजपाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी रद्द करुन त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोथरुड हा मतदारसंघ भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघातून मेधा कुलकर्णी २०१४ मध्ये १ लाखांहून अधिक मते घेऊन निवडून आल्या होत्या. मेधा कुलकर्णी यांचा जनसंपर्क या मतदारसंघात चांगला आहे. मात्र त्यांना डावलल्याने सुरुवातीला स्थानिक ब्राम्हण संघटनांनी चंद्रकांत पाटील यांना विरोध केला होता.
कोल्हापूरमधून पुण्यात निवडणूक लढविण्यासाठी आलेल्या चंद्रकांत पाटलांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. 'चंपा' या नावाने चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यात येत आहे. मात्र माझी आई लाडाने मला चंदा बोलते असं सांगत चंद्रकांत पाटलांनीही विरोधकांची फिरकी घेतली आहे. अशातच राष्ट्रवादीकडून काही मराठी म्हणींचे नवे अर्थ निघू लागलेत सांगत कोथरुडमध्ये बाहेरून आलेले चंद्रकांत पाटील म्हणजे आयत्या बिळात चंदूबा असं करुन चिमटा काढण्यात आला आहे.
कोथरुड मतदारसंघात मनसेने स्थानिक उमेदवार म्हणून किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात मनसेची ताकद थोड्या प्रमाणात आहे. किशोर शिंदे यांना मोदी लाटेतही या मतदारसंघातून २३ हजारांहून अधिक मते पडली होती. तर शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे हे २००९ मध्ये या भागाचे आमदार होते. त्यांना २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमाकांची मते पडली होती. यंदा या मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवार न देता किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर चंद्रकांत पाटील भाजपाकडून लढत आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध भाजपा अशी थेट लढत या मतदारसंघात पाहायला मिळत आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपा आपला गड कायम राखणार की मनसेचे इंजिन धावणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.