बारामती - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात रंग चढू लागला आहे. बारामती या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणतात मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, मी पैलवान तयार करतो पण सगळे पैलवान तुम्हाला सोडून का चाललेत? कोणी तुमच्यासोबत राहायला तयार नाही. या वयातही तुम्हाला महाराष्ट्रभर फिरावं लागतंय मग कसले पैलवान तुम्ही तयार केलेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाही, शरद पवारांची अवस्था शोल सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. अर्धे इथे जा, अर्धे तिथे जा बाकीचे मागे या, पण मागे कोणी उरलेच नाही. तुमचे पैलवान दिसत नाही. गेल्या निवडणुकीत ४१ निवडून आले या निवडणुकीत २० आकडाही पार करु शकणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच लोकसभेनंतर नॅनो पार्टी बनेल असं सांगितलं होतं ती कसर थोडी कमी झाली. आता यावेळेस ती कसर पूर्ण करणार आहोत. एका नॅनो गाडीत मावतील एवढेच लोक राष्ट्रवादीचे निवडून येणार आहे. अशाप्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅनो पार्टी बनणार आहे अशी खिल्ली मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उडविली आहे.
राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाला जे कागदपत्रे उपलब्ध आहेत हे कागदपत्रे पाहिली की लक्षात येईल यातला माल वाटेल तसा लुटण्याचं काम केलं. शेतकरी, गरीब माणसांचे कारखाने जाणीवपूर्वक हे कारखाने तोट्यात आणायचे, त्यावर प्रशासक बसवायचे, त्यानंतर विक्रीला काढायचे, त्यानंतर बोली लावून कारखाने विकत घ्यायचे असं काम शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले, ईडीने गुन्हा दाखल झाला. अजित पवारांनी राजीनामा दिला, आम्हाला वाटलं पश्चाताप झाला, सन्यास घेणार, सकाळी राजीनामा दिला, संध्याकाळी राजीनामा संपला, दुसऱ्या दिवशी पवारांकडे गेले अन् पुन्हा निवडणुकीला लागले अशा लोकांना तुम्हाला घरी बसवावे लागेल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.