अहमदनगर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार करताना मुख्यमंत्र्यांनी पार्सल परत पाठवा असं विधान केलं होतं मात्र पार्सल परत पाठवा हे मुख्यमंत्र्यांचे मनोगत होतं. त्यांना माहित आहे आपण काहीच केलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान हे कर्जत जामखेडसाठी नव्हतं तर कोथरुडकरांसाठी होतं असा टोला राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यंत्र्यांना लगावला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी मिराजगाव येथील सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील असे दोन मतदारसंघ असे आहेत ज्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कर्जत जामखेड, वरळी मतदारसंघात भावी नेतृत्वाचा कस लागणार आहे. मात्र एकजण मऊ गादी गलिचावरुन चालण्याचा निर्णय घेतला, सुरक्षित काय आहे ते बघितलं, तर दुसरीकडे काट्याकुट्यातून चालत वाट निर्माण करणारं नेतृत्व आहे. तुम्हाला नेता लाभला नाही तर हक्काचा दादा लाभला असं सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली तर रोहित पवारांचे कौतुक केले.
तसेच तु शेर है जिस जंगल का लेकीन हम वो शिकारी है जो तुझे तेरे जंगल मे आके ठोक देंगे अशी शायरी सांगत जर कोणाला सत्तेचा गर्व झाला असेल, आमदारकीचा असो वा खासदारकीचा मात्र ही वेळ बदलते नक्कीच असं सांगत अमोल कोल्हेंनी राम शिंदे यांच्यावर टीका केली.
दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जे चित्र बदलतं. महाजनादेश यात्रा गेल्यानंतर कमळाचा झेंडा घेऊन फिरणारा शिवस्वराज्य यात्रेत आला. रोहित पवार आमदार होणार म्हणजे कर्जत जामखेडमधल्या प्रत्येक लोकांचं स्वप्न साकार होणार आहे. विकासापासून वंचित असणारी जनता विरुद्ध मंत्री अशी ही लढाई आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची आहे. भाजपा म्हणजे भारी जाहीरात पार्टी आहे. २०१४ ला जाहिरात केली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? तोडलेल्या प्रत्येक झाडाचा हिशोब हा महाराष्ट्र विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा अमोल कोल्हेंनी सरकारला दिला आहे.