मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आज लागलेल्या निकालांमध्ये भाजपा आणि शिवसेना महाआघाडीने राज्यातील सत्ता पुन्हा एकदा राखण्यात यश मिळवले आहे. मात्र २०१४ च्या तुलनेत भाजपा आणि शिवसेनेच्या जागांमध्ये घट झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा कौल स्पष्ट झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीचे कारण सांगितले आहे. राज्यात भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या अधिकृत उमेदवारांविरोधात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बंडखोरीमुळे महायुतीला काही जागा गमवाव्या लागल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधानसभेच्या निकालात महायुतीच्या झालेल्या पिछेहाटीचे विश्लेषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सांगितले की, ''राज्यात महायुतीच्या उमेदवारांविरोधात दोन्ही पक्षातून मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. मात्र या बंडखोरांपैकी काही जण निवडून आले आहेत. पैकी १५ जणांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. तसेच अजून काही बंडखोर महायुतीसोबत येतील अशी अपेक्षा आहे.'' त्यामुळे महायुती भक्कम संख्याबळासह राज्यात सत्ता स्थापन करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला 'त्या' १५ आमदारांचंही बळ?... धक्का देणारेच संपर्कात; मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 5:11 PM