मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीमुळे राज्यात राजकीय आखाडा ढवळून निघाला आहे. त्यातच भाजपा नेते आणि राष्ट्रवादी नेते एकमेकांवर तुटून पडलेले आहेत. ईडी कार्यालयात जाऊ नका असं मला मुख्यमंत्र्यांनी फोन करुन सांगितलं होतं असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. पण शरद पवार धादांत खोटं आहे, मी कधीही पवारसाहेबांना फोन केला नाही की, तुम्ही ईडीच्या कार्यालयात जाऊ नका असं म्हटलं नाही असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
टीव्ही 9 च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवारांना मी ईडीच्या कार्यालयात जाऊ नका असं कधीच म्हटलं नाही. त्याउलट मला राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन आले ते जर मी सांगितले तर राष्ट्रवादी नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पण मी राजकारणात राजकीय नीतीमत्ता, औचित्य पाळणाऱ्यांपैकी आहे, मी त्याबद्दल काही सांगणार नाही. मात्र मी पवारांना कधीही फोन केला नाही असं त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री विरुद्ध शरद पवार असा सामना रंगला आहे. मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. परंतु कुस्तीचा राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात आमच्याकडे पैलवान नाही आम्ही कुणाशी पण कुस्ती खेळत नाही आणि तुम्ही त्या भानगडीत पडूच नका अशी टीका शरद पवारांनी मुख्यमंत्र्यावर केली तर निवडणुका जवळ आल्या तरी आमची लढाई कोणाशी हे कळत नाही, समोर कोणी दिसत नाही, आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत पण समोर लढणारा पैलवान तयार नाही अशी काँग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते निवडणूक असताना बँकाँकला फिरायला गेले.शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बचे तो मेरे पीछे आओ अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे. या निवडणुकीचा निकाल स्पष्ट आहे. भाजपा-शिवसेना मित्रपक्षाच्या महायुती अभूतपूर्व यशाने निवडून येणार याबाबत शंका नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.