भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. या निष्ठावंतांची तिकिटं का कापली असतील, त्यांचं काय चुकलंय, आता पुढे काय, यावरून चर्चा झडत आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले आहेत.
एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकिटं कापली असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण, पक्षामध्ये जबाबदाऱ्या बदलत असतात. त्यामुळे आता या नेत्यांची भूमिका बदलली आहे, त्यांना नवी जबाबदारी दिली जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप-शिवसंग्राम आणि रयत क्रांती या पक्षांच्या महायुतीची औपचारिक घोषणा आज करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य प्रमुख नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२४, मित्रपक्ष १४ आणि भाजपा १५० जागा लढवत असल्याचा फॉर्म्युला मुख्यमंत्र्यांनी सांगितला.
लोकसभेवेळी आम्ही युती केली होती. एखाद्या मुद्द्यावर मतभेद असतील, जागावाटपावरून तिढा असेल, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एक आहोत. युती होईल की नाही याबाबत अनेकांच्या मनात शंका होती. मात्र युती होणार यावर आम्ही ठाम होतो. व्यापर वैचारिक भूमिका आम्ही दोन्ही पक्षांनी स्वीकारली आणि दोन्ही पक्षांनी तडजोड केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. निष्ठावंतांना डावलून 'आयारामां'ना संधी दिल्याची टीकाही त्यांनी खोडून काढली. यावेळी बाहेरच्या पक्षातून अनेकांना भाजपा आणि शिवसेनेत यायचं होतं. ज्यांना आम्ही सोबत घेऊ शकत होतो त्यांना घेतलं. आमच्या उमेदवारी याद्या पाहिल्यात, तर त्यात निष्ठावंतच अधिक आहेत, असं त्यांनी नमूद केलं.
बंडखोरी करणाऱ्यांना इशारा
राज्याच्या अनेक भागात भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला. पुढच्या दोन दिवसांत जेवढे बंडखोर आहेत, त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यात कुठेही बंडखोरी राहणार नाही असा विश्वास आहे. जर कोणी बंडखोरी केली तर यापुढे त्याला युतीच्या कोणत्याच पक्षात जागा राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून त्याला त्याची जागा दाखविण्यासाठी ताकद पणाला लावू, असं त्यांनी खडसावलं.