महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 04:08 PM2019-11-01T16:08:19+5:302019-11-01T16:20:59+5:30
महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे.
मुंबई - महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार महाराष्ट्रातील चार मोठे नेते पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची आज भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्यात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण तसेच विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे. पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपाने शिवसेनेला फसवलं असल्याचा आरोप केला आहे.
'महाराष्ट्रातील अस्थिर परिस्थिती ही केवळ भाजपामुळे निर्माण झाली आहे. भाजपाने शिवसेनेची फसवणूक केली आहे. निवडणुका होऊन आठ-दहा दिवस झाले असले तरी अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही याला केवळ भाजपाचीच धोरणं जबाबदार आहेत. आमची सध्याची भूमिका ही वेट अँड वॉचची आहे. काँग्रेसचं नेतृत्वही या सगळ्या गोष्टींची माहिती घेत आहे' असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याची ही चर्चा सुरू आहे. काँग्रसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना-काँग्रेसच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. युतीच्या राजकीय भांडणाला बळी पडू नका. शिवसेना आणि भाजपाच्या वादात काँग्रेसने पडू नये असा सल्ला निरुपम यांनी आपल्या पक्षाला दिला आहे.
Ashok Chavan after Maharashtra Congress delegation met senior party leader KC Venugopal: BJP failed to keep its promises to allies & which is what led to the political crisis in Maharashtra. We are waiting and watching the situation, and we will take a decision at the right time pic.twitter.com/IEGC63It7w
— ANI (@ANI) November 1, 2019
शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांनी टाळ्या वाजवण्याचा सल्ला दिला आहे. 'शिवसेना नेहमीच सत्तेसाठी भाजपासोबत भांडते आणि शेवटी आपला हिस्सा घेऊन सत्तेत बसते. यावेळीही ती सरकारचा एक हिस्सा असणार आहे. मात्र आता शिवसेना आणि भाजपाच्या नाटकात काँग्रेसने पडू नये. तर ते नाटक लांबून पाहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यांच्यातील भांडणं ही अधिक वाढतील हे पाहिलं पाहिजे. आमच्यातील काही नेतेमंडळी शिवसेनेकडे प्रस्ताव घेऊन जाण्याचा विचार करत आहेत मात्र हे चुकीचं आहे. शिवसेनेसोबत गेल्यास काँग्रेसचं अधिक नुकसान होईल. काँग्रेस नेते शिवसेनाला पाठिंबा देण्याचा विचार कसा करू शकतात?' असं मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना निरुपम यांनी असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा 'टाळ्यां'चा सल्लाhttps://t.co/9shZHBw2il#MaharashtraElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) November 1, 2019
काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं म्हटलं आहे. 'शिवसेना आणि काँग्रेस यांची विचारसरणी ही अत्यंत वेगळी आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जनतेचा कौल मान्य करून विरोधी पक्षात बसावं. काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये' असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच कोणाला दूर ठेवावं आणि कोणाला जवळ करावं हे नेतृत्त्व ठरवेल असं ही त्यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी असं म्हटलं आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. निरनिराळे तर्क केले जातात. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार की भाजपाला अशी शंका निर्माण झाली आहे. मला वाटतं ही शंकाच आहे. काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. कुठल्याही धर्मावर, जातीवर भूमिका मांडणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ शकत नाही. त्यांची विचारधारा वेगळी, आमची वेगळी आहे. 60 वर्षं धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर निवडणुका लढवल्या आहेत. आम्ही विरोधात बसून जनतेची सेवा करायला तयार असल्याचं देखील सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019 : काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये - सुशीलकुमार शिंदेhttps://t.co/C5RHI6ywrN#MaharashtraElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) November 1, 2019