Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

By अतुल कुलकर्णी | Published: October 10, 2019 04:25 AM2019-10-10T04:25:55+5:302019-10-10T04:30:04+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election: दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही.

Maharashtra Election 2019: Congress bajiprabhu as balasaheb thorat | Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

Maharashtra Election 2019 : काँग्रेसचे बाजीप्रभू...

Next

- अतुल कुलकर्णी

मी बाजीप्रभूसारखा लढत आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वत:ची अवस्था अधोरेखित केली आहे. मात्र स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याने त्यांनी अनेकांची अडचण केली आहे. आपल्यासोबत अनेक जण काम करत आहेत, पण मी मात्र अठरा अठरा तास काम करतोय असेही म्हणाले; पण ज्या गतीने आणि ज्या शिस्तीत भाजपचे काम चालू आहे ते पाहिले तर काँग्रेसमध्ये नेमके काय चालू आहे असा प्रश्न पडतो. दिल्लीच्या पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना हवे ते मतदारसंघ वाटून घ्यावेत अशी सूचना आली त्यावेळी कोणीही पुढे आले नाही. अशोक चव्हाण यांना राजीव सातव नको आहेत, बाळासाहेब थोरात यांनी आपल्यासाठी शब्द टाकला नाही असे सांगत हर्षवर्धन पाटील काँग्रेस सोडून गेले. काँग्रेसमध्ये सभा गाजवणारा, शहरी, ग्रामीण दोन्हीकडे चालू शकणारा चेहरा थांबवून ठेवण्यात यश येत नसेल तर बाजीप्रभूंची झुंज नेमकी कोणासाठी चालू आहे? असा प्रश्न येतो. पृथ्वीराज चव्हाण मुंबईतल्या माध्यमांचे आवडते. त्यांच्या बोलण्याला प्रसिद्धी मिळते हे लक्षात घेऊनही ते मुंबईबाहेर कसे राहतील याकडे अन्य नेत्यांचे लक्ष लागलेले. शिवाय, त्यांनी सातारा लोकसभा लढवावी असे पिल्लू सोडले गेले, कारण काय तर चव्हाण दिल्लीत गेले तर राज्यातील विरोधी पक्ष नेतेपदाची स्पर्धा कमी होईल...! या नीतीने आणि वृत्तीने जर काँग्रेसचे नेते वावरत असतील तर पक्ष कसा उभा राहणार? मुंबईत पक्षाच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरु आहे पण तेथे काम करण्यासाठी जी यंत्रणा लोकसभेच्यावेळी होती, ती आज दिसत नाही. काँग्रेसमधला एकही नेता राज्यभर फिरताना, सरकारच्या अपयशाच्या कहाण्या सांगताना, आक्रमकपणे सरकारवर हल्ला चढवताना, मंत्र्यांवर गंभीर आरोप करताना दिसत नाही. सगळे काही स्वत:ला सांभाळून. उगाच आपले काही निघाले तर काय करायचे? ही भीती या नेत्यांच्या वागण्या, बोलण्यातून स्पष्ट दिसते आहे. त्याउलट राष्टÑवादीत ८० वर्षाचा तरुण नेता राज्य ढवळून काढत आहे. माध्यमांकडे जाणे, स्वत:हून मुलाखती देणे, परसेप्शन बदलण्यासाठी काम करणे या गोष्टींचे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना वावडे झाले असावे असे चित्र आहे. जो तो आपापल्या मतदारसंघाच्या बाहेर पडायला तयार नाही, किंवा आक्रमक प्रचार करण्याच्या मनस्थितीत नाही. प्रचाराचा फुगा तोंडानेच फुगवणे सुरु असताना सुशीलकुमार शिंदे यांनी त्यालाच टाचणी लावणारे विधान केले. अजीर्ण होईल एवढ्यावेळा भाजपकडून कलम ३७० पुढे केले जात असताना ही निवडणूक राज्यातल्या प्रश्नावर, विकासावर नेण्याचे काम करण्याची मोठी जबाबदारी विरोधकांची असताना त्यासाठीही कोणी जीवाचा आकांत करताना दिसत नाही. मग खिंड कशी लढणार..? गडावर महाराज सुखरुप पोहोचले की तोफांचे आवाज करा, तोपर्यंत मी खिंड लढवतो अशी जीद्द बाजीप्रभूमध्ये होती. असेही सांगितले जाते की बाजीप्रभूचे शीर कलम केले तर त्यांचे तलवारी घेतलेले दोन्ही हात विद्यूत वेगाने चालतच होते. त्यातला अतीशयोक्तीचा भाग वगळला तरीही इथे जागेपणी विरोधकांवर हमला करण्यासाठीचा आक्रमकपणा हरवलेला दिसत आहे. त्यामुळे केवळ बातम्यांसाठी स्वत:ला बाजीप्रभू म्हणून घेण्याचे विधानसभेचे युध्द जिंकता येईल अशी स्थिती नाही.

Web Title: Maharashtra Election 2019: Congress bajiprabhu as balasaheb thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.