महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:27 PM2019-10-23T13:27:16+5:302019-10-23T13:29:25+5:30
निकालानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात,
मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकाल काही तासात लागणार आहे. राज्यभरात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचे अंदाज वर्तविले जात आहे. भाजपा-शिवसेनेला पुन्हा एकदा बहुमत मिळणार असल्याचं चित्र एक्झिट पोलवरुन दिसत आहे. मात्र यामध्ये भाजपाला किती जागा मिळणार आणि शिवसेना किती जागांवर विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
मात्र तत्पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी एका वृत्तवाहिनीली मुलाखत देताना केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. निकालानंतर शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात, राजकारण काय काय होऊ शकते? काहीही अशक्य नाही असा सूचक इशारा काँग्रेसने भाजपाला दिला आहे.
एक्झिट पोल प्रमाणे शिवसेनेला जर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला व यांना काँग्रेसने बाहेरून पाठींबा दिला तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनू शकतात व "मी पुन्हा येईन" म्हणून सांगणारे घरी बसू शकतात. युद्धात, प्रेमात सर्व माफ असतं असं सांगत एकप्रकारे शिवसेनेला बळ देण्याचा निर्णय राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी घेऊ शकते असं सूचक विधान केलं आहे.
दरम्यान, भाजपाला स्वबळावर बहुमत मिळाल्यास शिवसेनेला सत्तेत वाटा देणार नाही अशी चर्चा आहे त्यावर तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना हे प्रत्येक पक्षाला लागू होतं. सत्ता म्हणजे सर्वोच्च नाही, उद्याचे निकाल लागल्यावर शिवसेना काय आहे हे कळेल. राज्यातील जनता सुज्ञ आहे, युतीत आम्ही निवडणुका लढलो आहे तर सत्तेतही एकत्र राहणार आहे. शिवसेना १०० जागांवर विजयी होणार आहे. भाजपाला जास्त जागा मिळाल्या तरी शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
तर उद्धव ठाकरे हेदेखील शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार असल्याची घोषणा केली होती. एक्झिट पोलच्या निकालानुसार काही ठिकाणी शिवसेनेला १०० वर जागा जिंकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं घडल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा १४५ गाठणं शिवसेनेसाठी कठीण होणार नाही. तर भाजपाला स्वबळावर बहुमतासाठी १४५ जागा मिळविणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला किती जागा मिळणार यावर राज्याचं पुढचं राजकारण तयार होणार आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.