मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी भाजपाने असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेची सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यात मुख्यमंत्रिपद बसविणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत काँग्रेसची सकाळी १० वाजता बैठक आहे. पक्षाचे हायकमांड ठरवतील तो निर्णय घेणार पण आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असं खर्गे यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना कसरत करत होणार आहे. सत्तास्थापनेसाठी आज दिल्लीपासून मुंबईत अनेक महत्वपूर्ण बैठकी होत आहे. शिवसेना आमदारांची बैठक सकाळी ९.३० च्या सुमारास द रिट्रिट हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांकडून समर्थन पत्रावर सह्या घेणार येणार असल्याची माहिती आहे. तर राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकही बोलविण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची भूमिका काय असेल त्याची वाट पाहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
तर्तास शिवसेनेला जर पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं विधान राष्ट्रवादीने केलं होतं. त्यामुळे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे.