- अतुल कुलकर्णी मुंबई : शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणेयोग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी सायंकाळी पुण्यात खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्यानंतर, रात्री पवार दिल्लीला जातील.लोकसभेचे अधिवेशन सोमवारी सुरू होत आहे. सोनिया गांधी व शरद पवार यांची भेट रविवारी होणार अशा बातम्या माध्यमांमधून आल्या. मात्र, अशी बैठक ठरलीच नाही, असे सांगून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, सोमवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल, के. सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, तसेच खा. शरद पवार यांच्यासह खा. प्रफुल्ल पटेल, खा. सुनील तटकरे यांची बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीसाठी पुण्यात राष्टÑवादीच्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे.त्यानंतर, सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बैठकीबद्दल निर्णय होईल, असे समजते. या बैठकांनंतरच सत्तास्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत जाण्याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. गेल्या दोन दिवसांत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांशी झालेल्या बैठकांच्या छायाचित्रांवरून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. राज्यातील काँग्रेस आमदार लवकर निर्णय घ्या, असा दबाव वाढवत आहेत.
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; ३ पक्षांच्या नेत्यांची राज्यपाल भेट रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 4:33 AM