महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 07:33 PM2019-11-14T19:33:29+5:302019-11-14T19:52:08+5:30

लवकरच राज्यात निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता

Maharashtra Election 2019 congress ncp shiv sena makes draft about common minimum program to form government | महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

Next

मुंबई: राज्यात महाशिवआघाडी आकारास येण्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आज पहिली समन्वय बैठक झाली. या बैठकीत तिन्ही पक्षांनी एक मसुदा तयार केला. हा मसुदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पाठवण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता आहे. 

राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आज पहिली समन्वय बैठक झाली. महाशिवआघाडीच्या सरकारचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. लवकरच हा मसुदा तिन्ही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता कोंडी लवकरच फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आज सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या समन्वय बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नवाब मलिक, छगन भुजबळ तर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई बैठकीला हजर होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुढील दोन दिवसांत सोनिया गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. या भेटीत महाशिवआघाडीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांना १७ नोव्हेंबरला मुंबईत बोलावलं आहे. १७ नोव्हेंबरला शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात महाशिवआघाडीची घोषणा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील रिट्रीट हॉटेलमध्ये होते. कालच त्यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश देण्यात आले. 

काल सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू होत्या. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला सत्ता स्थापनेची घाई नसल्याचं म्हटले होते. कालच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या बैठकीला दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, नवाब मलिक, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण व विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता.

Web Title: Maharashtra Election 2019 congress ncp shiv sena makes draft about common minimum program to form government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.