महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 01:40 AM2019-11-20T01:40:08+5:302019-11-20T01:40:37+5:30

शिवसेना-भाजपसारखी धर्मांध नसल्याची मांडली भूमिका

Maharashtra Election 2019: Congress should not seize the opportunity for power - Hussain Dalwai | महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

Next

- टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सौजन्यशील नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेले बदल पाहावयास हवेत. आरएसएस-भाजपची भूमिका शिवसनेने कधीही स्वीकारलेली नाही, अशा शब्दांत खासदार हुसैन दलवाई
यांनी शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य आघाडीचे समर्थन केले.

शिवसेनेचे साबीर शेख कामगारमंत्री होते, हाही इतिहास आहे. अब्दुल सत्तार शिवसेनेकडून आमदार झाले. भाजपने किती मुस्लिमांना उमेदवारी दिली? शिवसेना धर्मनिरपेक्ष नाही; पण भाजपसारखी धर्मांधही नाही. त्यामुळे भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना बळ द्यायचे असेल, तर काँग्रेसने शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्तास्थापन करावी, असा आग्रह दलवाई यांनी स्वपक्षाच्या नेत्यांकडे धरला आहे.
दलवाई म्हणाले, मी व माझ्या कुटुंबियांनी मुंबई दंगलीची झळ अनुभवली आहे. तेव्हाही शिवसेनेशी संघर्ष केला. १९८५ साली विधानसभा निवडणुकीत मला शिवसेना समर्थकांनी मारहाण केली. असे असले तरी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हाच शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादीचा धर्म असावा, असे मला वाटते. 

काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप चुकीचा आहे. अनेक मुद्यांवर चर्चा होत असल्याने सावधानता बाळगणे आवश्यक आहे. उद्या रामविलास पासवान, रामदास आठवले व नितीशकुमारांसारखे नेते ‘संपुआ’मध्ये येणार असतील, तर दीर्घ चर्चेची गरज भासणार नाही; पण शिवसेना वेगळ्या विचारांची आहे. त्यामुळे आमचे नेतृत्व अत्यंत सावधपणे यासंदर्भात चर्चा करीत आहे, त्याचेही समर्थन दलवाई यांनी केले.

असा असावा समान कार्यक्रम
शालेय शिक्षणात सुधारणा, सत्तास्थापनेनंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी, सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी. मुस्लिम आरक्षण, कंत्राटी कामगारांना संरक्षण, नव्या उद्योगांना चालना, असे मुद्दे दलवाई यांनी किमान समान कार्यक्रमासाठी सुचविले.

Web Title: Maharashtra Election 2019: Congress should not seize the opportunity for power - Hussain Dalwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.