मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरी अद्याप महायुतीमधील सत्तापदांच्या वाटपाचा संघर्ष संपलेला नाही. त्यातच आता शिवसेनेनं राज्यात फोडाफोडीचं राजकारण होत असल्याचा आरोप करत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सत्तेचा वापर करून ‘फोड झोड’ करणार असाल तर खबरदार, असा इशाराच शिवसेनेनं भाजपाला दिला आहे. यावरुन आता काँग्रेसनं भाजपा आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. महायुतीला सत्ता स्थापनेचा नैतिक अधिकार आता राहिला आहे का?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. 'शिवसेना हा भाजपाचा सहयोगी पक्ष व महायुतीचा सदस्य असतानाही जर त्यांना भाजपा आपले आमदार फोडेल ही भीती वाटत असेल तर भाजपा किती नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहे आणि महाराष्ट्राला भाजपा पासून का वाचवले पाहिजे हे लक्षात येईल,' असं ट्विट सावंत यांनी केलं आहे. शिवसेनेनं फोडाफोडीच्या राजकारणाची शक्यता वर्तवल्यावर सावंत यांनी हे ट्विट केलं. फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंटवर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे होत आले तरीही शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला सत्ता वाटपाचा संघर्ष अद्याप कायम आहे. आज दिवसभरात होऊ घातलेल्या घडामोडी पाहता सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपावरून सुंदोपसुंदी सुरू आहे. या संघर्षाला आज पूर्णविराम मिळण्याची चिन्हं आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुपारी 2 वाजता भाजपा नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेणार आहेत. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो.